चर्चा सुरु करताना मी कुठलेही मतप्रदर्शन केले नव्हते. केवळ या साठी कि मनोगतींची मते कुठल्याही बाजूस झुकलेली नकोत. रिडर्स डायजेस्टने सर्वेक्षण केले याचा अर्थ तेच ते ग्राह्य धरावे असा नाही पण त्या अनुषंगाने स्वतःला पारखून पहाण्याची कळ डोक्यात उत्पन्न झाली हे ही नसे थोडके.
मत प्रदर्शन प्रत्येकाने केले पण मुंबईच्या उर्मटपणा बद्दल अनुभव लिहिण्यास सांगण्यात आले होते तेव्हा मात्र माझ्यासकट सर्व मनोगतींनी आपला बहुमूल्य वेळ पुणेरी उर्मटपणा, पाश्चात्य शिष्टाचारांतील फरक आणि आपला फुकाचा मराठी बाणा दाखवण्यात घालवला.
तेव्हा ही चर्चा करमणूक आहे असे मानण्यास हरकत नाही.
पाश्चिमात्य सर्वेक्षण त्यांच्या पद्धतीने आपल्याला लागू होते की नाही यापेक्षा आम्ही "उर्मट" आहोत का याचा विचार एक दोघांनीच केल्याचे दिसते. मंदाररावांचा प्रतिसाद उत्तम.
जसे पुणेरी किस्से आहेत तसे मुंबईचे किस्से ही असावेत. तसे ते आले असते तर बरे झाले असते.
उर्मटपणाचा माझा अनुभव असा.
रिक्षात बसले कि का कुणास ठाऊक पण प्रत्येक सिग्नल ला हे रिक्षावाले पचापचा थुंकत असतात. एक दोनदा त्यांना खडसावले असता, "आप अंदर बैठी है ना? आपको क्या तकलीफ है?" असा प्रतिप्रश्न आला.
----
ह्या अनुभवाचा आणि माझा अमेरिकेत असण्याचा काडिएक संबंध आहे असे मला वाटत नाही. इतरांची तशी धारणा असल्यास त्याला मी जबाबदार नाही.