तुम्हीआता मूळ विषयाकडे..
हिंदी सिनेमात मराठी हेल काढत कॅरीकेचर (व्यंगचित्र हा शब्द इथे बसत नाहीये) सदृश वावरणारी मराठी पात्रे असावीत का?
हेराफेरी मधील पात्र यापेक्षा काय वेगळे होते? 'आपटे' आडनाव असणाऱ्या माणसाला तो हेल योग्य होता का? जातिवाचक बोलण्यात मला रस नाही तरी प्रत्येक जाती स्वतःची भाषा आणि हेल घेऊन येतात. त्याचा अभ्यास खरच मजेशीर असतो. संवादलेखकांची ही जबाबदारी नाही का?
नटांबद्दल काय बोलावे. त्यांच्याइतकी माजुरडी जमात या पृथ्वीतलावर नाही. आपल्या व्यक्तिरेखेसाठी काही अभ्यास करायचा असतो काही कष्ट करायचे असतात हे काही सन्माननीय अपवाद वगळता कुणाच्या गावीही नसते. बर आपल्याला हिंदी सिनेमा कडून मिडीऑकर अपेक्षा ठेवायची इतकी सवय आहे की यांचा फालतू अभिनयही खपून जातो नाहितर मालिकांना इतकी लोकप्रियता कशाला मिळाली असती. असो मालिका हा विषय वेगळा..
आता जरा मराठी पात्रे कुठली असतात तिकडे बघू.. नोकर, लाचखोर पोलिस, गुंड, बँकेतील सर्वात कणाहीन कर्मचारी... हे सगळे वातावरणनिर्मितीसाठी असतात. मूळ प्रोटॅगोनिस्ट कधीही मराठी असत नाही काही ०.०१% अपवाद वगळता.
आम्हाला प्रोड्यूसर्सकडून सांगितले जाते की 'ये हिंदी फिल्म है, मराठी ऍट्मॉस्फिअर नही चलेगा. मराठी स्टार नही चलेगा.' म्हणजे पंजाब की मिट्टी, सरसो का साग चालतं, राजपूत प्राईड, गुजराथी दांडीया चालतो, बंगाली सोन्देश आणि वातावरण चालते.. अगदी गेलाबाजार दक्षिणेतले गाव चालते.. पण मराठी प्रिमाइस असलेला विषय चालत नाही.
स्वतःवर कैकवेळा बलात्कार झाले म्हणून डाकू बनून २२ खून करणाऱ्या फूलनदेवीची कहाणी सिनेमाचा 'हाय पोटेन्शियल' असलेला विषय म्हणून चालते (चित्रपट म्हणून हा कसा केला होता ही गोष्ट इथे दुय्यम आहे) पण अतिशय हुशार आणि विचारी जाणत्या राजाची गोष्ट यांना चालत नाही....
पण याला मान तुकवावी लागते अनेकदा कारण आम्हाला याच क्षेत्रात रहायचं असतं आणि आपलं घर चालवायचं असतं. तसेच चित्रपटात पैसा घालू शकणारे प्रोड्यूसर्स वा फायनान्सर्स हे ९९% अमराठी असतात आणि चित्रपट साकारण्यासाठी पैसा लागतो.
काही गोष्टी एकदम डोक्यात आल्या म्हणून इथे लिहिल्या. तक्रार करायची इच्छा आणि सवय नाही. आणि याला उत्तर फक्त आमचे कामच असू शकेल ह्याचीही कल्पना आहे. परंतू तुम्ही सर्वांनीच थोडे डोळसपणे आणि जागरूकपणे सिनेमा समजून घ्यायचा प्रयत्न केला तर अनेक चुकीचे प्रवाह तुम्ही नाकाराल नी ते बंद होतील. काहीतरी बरं घडेलही. ही १-२ वर्षात होणारी गोष्ट नाही पण १-२ पिढ्यांत नक्कीच होऊ शकते. प्रेक्षक म्हणून तुमच्याकडून थोड्या जास्ती जागरूकपणाची अपेक्षा आहे. मिळेल?
नीरजा