वृत्तवाहिन्यांवरच्या ह्या "बातम्या" वाचून करमणूक झाली खरीच. सूर्यावर कोणाचीच छाया पडू शकत नाही हे जरी आजच्या शेंबड्या पोराला जरी माहित असले तरी ती फलज्योतिषाची भाषा आहे, म्हणून ज्योतिषी ती तशी वापरतात असे मला वाटते. "सूरज पर पडी चांद की छाया" चा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो तर "सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान चंद्र अशी स्थिती" असा त्याचा अर्थ असतो. ही माझ्यामते ज्योतिषात चालत पूर्वापार आलेली भाषा आहे. ती बदलणे योग्य ठरेलच, पण तिचा मथितार्थ समजावून घेणेही योग्य ठरेल.

२१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कारण ह्या दिवशी सूर्य कर्कवृत्तावर असतो व ह्या दिवसानंतर तो दक्षिणेकडे वाटचाल करायला सुरूवात करतो. आता हे वाक्य वाचल्यावरही काहींच्या मनात सूर्य कुठे वाटचाल करतो? तो तर स्थिर असतो, पृथ्वीच त्याच्याभोवती फिरते असे आले असेल. पण तेव्हाच ह्या वाक्याचा मथितार्थ समजावून घेणाऱ्याला हे वाक्य तितकेसे खटकले नसेल. तसेच "सूरजपर पडी चांद की छाया"चे आहे. मात्र २१ जून ला "धरती का सबसे बडा दिन" म्हणणे हे मात्र नक्कीच चुकीचे आहे. २२ डिसेंबर हा दक्षिण गोलार्धासाठी सर्वात मोठा दिवस असतो.

जाताजाता थोडी अधिक माहिती-

पृथ्वी सूर्याभोवती अपास्त (एलिप्टिक) कक्षेमध्ये फिरते व सूर्य हा ह्या अपास्ताच्या दोनापैकी एका केंद्रबिंदूवर आहे. त्यामुळे ह्या कक्षेमध्ये फिरताना पृथ्वी एका विशिष्ट बिंदूवर सूर्यापासून जास्तित जास्त लांब असते तर एका बिंदूवर सूर्याच्या जास्तितजास्त जवळ असते. ह्या सूर्याच्या जवळ असण्याच्या काळामध्ये दक्षिणायन चालू असते, तर लांब असण्याच्या कालावधीमध्ये उत्तरायण चालू असते. त्यामुळे दक्षिण गोलार्धातील उन्हाळ्याची तीव्रता ही उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याच्या तीव्रतेपेक्षा अधिक असते.