तुम्ही ज्योतिषाने वापरलेले "शब्द" व "शब्दार्थ" ह्यांचा वापर करून गृहितके चूक ठरवली आहेत. मात्र ज्योतिषशास्त्राच्या परिभाषेनुसार त्या शब्दांचे "मथितार्थ" लक्षात घ्यायला हवेत, शब्दार्थ नव्हे.

पूर्वी अवकाशस्थ गोलकांना ज्योती/तारे/ग्रह अशी सरसकट संज्ञा होती. काही आपले स्थान न सोडणारे स्वयंप्रकाशी ते तारे, तर आपले स्थान सोडणारे स्वयं वा परप्रकाशी गोलक जे ग्रह व अवकाशस्थ तेजस्वी गोष्टी (स्वयं वा परप्रकाशी, चल वा अचल) त्या ज्योती अशा ढोबळ स्वरूपाच्या व्याख्या होत्या. आजच्या विज्ञानात आपण त्या जास्त अचूक व अरूंद अर्थाने वापरतो. मात्र ज्योतिषाचा विचार करताना ढोबळ अर्थच विचारात घेतला पाहिजे. कारण त्यावेळी ते शब्द ही ज्योतिषाची परिभाषा असते. त्या दृष्टीने सूर्य, चंद्र, बुधादि ग्रह, राहू-केतू हे बिंदू ह्या गोष्टी "ग्रह" तर नक्षत्रांमधील ज्योती ह्या "तारे" असतात. आता ही परिभाषा वापरून तुम्हीच वरील गृहितके पुन्हा पडताळून बघा.

माझ्यामते ज्योतिषशास्त्र हे शास्त्र मानायला हरकत नसावी, कारण त्यामध्ये कालमापन, ग्रह स्थिती, नक्षत्रांचे निरीक्षण करून काही ताळेबंद मांडला आहे. त्या गणितानुसार ग्रहणे कधी व केव्हा होतील, कुठून दिसतील, कोणता ग्रहाला कोणत्या नक्षत्राची पार्श्वभूमी कधी व किती काळ असेल वगैरे अंदाज करता/ठरवता येतात.

फलज्योतिष हे माझ्यामते संख्याशास्त्रातील कोरिलेशन वा परस्पर संबंधाचे फलित आहे. त्या परस्पर संबंधामध्ये माझ्यामते कार्यकारण भाव असलाच पाहिजे असे नसते. आधीही एका चर्चेत लिहिल्याप्रमाणे मी माझे वय वर्षांच्या टप्प्यामध्ये एका रकान्यात लिहिले व दुसऱ्या रकान्यात दहा वर्षांच्या टप्प्यामध्ये वातावरणातील कर्बद्विप्रणिल वायूचे प्रमाण लिहिले आणि हे दोन रकान्यातील संख्या वापरून त्यातील कोरिलेशन काढले तर ते ०.७ पेक्षा जास्त येऊही शकते. समजा ते फारच चांगले म्हणजे ०.९ वगैरे आले आणि मी ह्या दोन रकान्यांवरून एक समान सूत्र तयार करू शकले, तर माझ्या आजच्या वयावरून मी दहा वर्षांनंतरच्या काळातील कर्बद्विप्रणिल वायूच्या प्रमाणाचे भाकित करू शकेन, जे कोरिलेशन चांगले असल्यामुळे बऱ्यापैकी खरे ठरू शकेलही. मात्र ह्या दोन गोष्टींमध्ये कार्यकारण भाव नाही. माझे वय हे काही वातावरणातील एखाद्या वायूच्या प्रमाणातील बदलाचे कारण होऊ शकत नाही.

तसेच फलज्योतिषाचे आहे. नक्षत्रांचा वा विशिष्ट ग्रहाला विशिष्ट नक्षत्राची पार्श्वभूमी असणे आणि माझ्या जीवनात एखादी घटना घडणे ह्यात कार्यकारण संबंध नसला तरी संख्याशास्त्रीय कोरिलेशन असू शकते. त्यामुळे फलज्योतिषावर माझा फारसा विश्वास नाही. शिवाय पूर्वी लोकसंख्या, कर्मसंख्या मर्यादित असल्यामुळे हा संबंध लावणे तुलनेने सोपे होते, जे आता तसे राहिले नाही. 

आता प्रश्न तेराव्या राशीचा. तेरावी रास ऑफियूकस ही अलिकडे अंतर्भूत झाली आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रातील गृहितक चुकीचे आहे असे म्हणणे योग्य नाही. पूर्वीही ऑफियूकस मधले तारे आता आहेत तिथेच होते, फक्त त्या तारकासमूहाला राशीचा दर्जा नव्हता. फलज्योतिषाचा संबंध मूळच्या १२ राशींशी असल्यामुळे तेराव्या राशीमुळे "गृहितक चुकीचे" वगैरे ठरत नाही.

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असल्यामुळे आणि कमी अंतरावर असल्यामुळे त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा जेवढा परिणाम पृथ्वी व पृथ्वीवासियांवर होईल तेवढा शनिच्या उपग्रहांचा होणार नाही. त्यासाठीही गृहितक चुकीचे वगैरे म्हणणे योग्य आहे असे मला वाटत नाही. राहू केतू हे बिंदू असल्यामुळे ग्रगोलांप्रमाणे गुरूत्वाकर्षणाचा परिणाम होत असला तरी त्या बिंदूंना ग्रहणामध्ये महत्त्व आहे.

फलज्योतिषातील शुभाशुभावर माझाही फारसा विश्वास नसला, तरी शब्दांचे मथितार्थ जाणून न घेता केवळ शब्दार्थाशी खेळून कशालाही थोतांड (थोथांड नव्हे) म्हणण्यापूर्वी आधी ती गोष्ट संदर्भासह समजावून घेण्याचा प्रयत्न करावा असे माझे मत आहे.