हिंदीचे हे आक्रमण इंग्रजीपेक्षाही अधिक भयावह आहे ह्याबाबत स्पष्टीकरणः
महाराष्ट्रात २% लोकांना इंग्रजी चांगले बोलता येते. बाकी खेड्यापाड्यात लोकांना हिंदी समजते. त्यामुळे होते काय की मराठीवाचून कोणाचे अडत नाही. आज परराज्यातील खूप लोक महाराष्ट्रात रोजगारासाठी येतात. पण कोणीही मराठी शिकायच्या फंदात पडत नाही. बस स्थानके, रेल्वे स्टेशन्स, हॉटेल्स सर्वत्र हिंदी चालते. आता तर आपण वृत्तपत्रातील हिंदी पण चालवून घेतो. अशीच मराठीची गळचेपी सुरू आहे.
हा झाला एक मुद्दा.
आता दुसरा मुद्दा तुम्हीच सांगितला आहेः
हिंदी ही भारतीय भाषा आहे नि शिवाय ती मराठीप्रमाणेच संस्कृतशी जवळीक साधणारी आहे.
भाषा ही नुसती भाषा नसून ती एक संस्कृती असते. मराठीची एक वेगळी संस्कृती आहे जी उत्तर भारतीय संस्कृती पेक्षा निराळी आहे. पण विविध प्रसार माध्यमे आणि चित्रपट ह्यामुळे आपल्या संस्कृतीवर पण त्या संस्कृतीचे आक्रमण होत आहे.
उदाः कडवा चौथ
हे आक्रमण फक्त सणवार ह्या पुरते मर्यादित नसून, ते खाद्य पदार्थ, पोषाख, लग्नसमारंभ, रिती-रिवाज ह्या सर्वांवर होत आहे.
मराठी ही हिंदी प्रमाणेच भारतीय भाषा आहे आणि दोन्ही भाषा इंग्रजीमधून नवनवीन संकल्पना घेत आहेत. (विज्ञान, तंत्रज्ञान). त्यामुळे हिंदी ही मराठीपेक्षा वरचढ भाषा नाही. वा जास्त समृद्ध भाषा पण नाही.
तुम्हीच सांगितल्याप्रमाणे, आपण हिंदी शब्द लवकर आत्मसात करत आहोत. ते शब्द जास्ती जवळचे वाटतात. त्यामुळे मराठी शब्द मागे पडत आहेत.
ह्या मध्ये मराठी माणसाची मानसिकता आहेच. पण तो वेगळा मुद्दा आहे. जास्त धोका कोणाचाः हिंदी की इंग्रजीचा ते ओळखणे पण महल्ल्वाचे आहे.