राखी सावंत या बयेबद्दल काडीचाही पुळका नाही. तिची ती भीषण नृत्ये (?), कपडेउतारू चाळे या सर्वांबद्दल चीडच आहे. या सगळ्या प्रकारात ती किती खरे बोलतेय आणि किती स्टंटबाजी हा मुद्दा पण मान्यच आहे. पण मला एक सर्वसाधारणपणे प्रश्न विचारायचा आहे.

बलात्कार किंवा विनयभंगाच्या संदर्भात संमतीशिवाय जवळीक अशी व्याख्या केली जाते. मग ती स्त्री काहीही कपडे घालूदेत. तिचा व्यवसाय काहीही असूदेत. तिचे गुन्हा करणाऱ्याशी काहीही नाते असूदेत. म्हणजेच ती अशी अशी नृत्ये करते म्हणजे ती ऍव्हेलेबलच असणार आणि तिने मिनी स्कर्ट घातला आहे म्हणजे 'शी इज आस्किंग फॉर इट!' (माफ करा याचे चांगले मराठी भाषांतर जमत नाहीये), हाच तर धंदा आहे तिचा, तिला कसला चॉईस, लग्नाची बायको आहे तर इच्छेचा काय संबंध... या गोष्टी अयोग्य आहेत. आज मॅरिटल रेप ही गोष्टही कायद्यात गुन्हा म्हणून धरली जातेय अश्यावेळी केवळ राखी सावंत ही बया उन्मादक नृत्ये आणि चाळे करते म्हणून ती रिस्पेक्टेबल नाही आणि तिचा विनयभंग होऊ शकत नाही किंवा तिला तक्रार करण्याचा अधिकार नाही हे म्हणणे चूक नाही का?

एक नक्की की या सगळ्यात वृत्तपत्रे खूप गलिच्छ भूमिका निभावतायत. नको तेवढी प्रसिद्धी या प्रकाराला मिळतेय. आणि सगळे चमचमीत वाचायला मिळावे तसे यावर तुटून पडतायत. एकाप्रकारे हेही सॉफ्ट पोर्नोच की.

नीरजा