फल्ज्योतिष्याविषयी अनुकूल वा प्रतिकूल मते नोंदविणाऱ्यापैकी किती लोकानी त्याचा अभ्यास केला आहे? मी स्वतः त्याचा अभ्यास केलेला नाही आणि माझा त्यावर विश्वास नाही म्हणजे मी माझी कामे त्यावर विसंबून करत नाही.पण त्याचबरोबर अनुभवामुळे त्यावर विश्वास ठेवणाऱ्याला मी नावे ठेवत नाही.यावर माझ्या जवळच्या व्यक्तीना आलेले अनुभव सांगतो.
१)माझ्या मित्राच्या मुलीला (विद्या-तिचे नाव)तिची पत्रिका पाहून तुला एक मुलगी आणि एक मुलगा होणार असे सांगितले‌. सागणारी व्यक्ती त्यांच्या घरगुती संबंधातील आणि ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास करून त्याच्या परीक्षा दिलेली अशी होती.लग्नानंतर तिला एक मुलगी झाली आणि ती मुलगी पाच वर्षाची झाल्यावर तिच्या नवऱ्याने नसबंदी करून घेतली.त्यावेळी भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीला त्यानी बघा आता तुमच्या भविष्याचा काय निकाल लागला असे चिडविलेही!त्यावर त्या व्यक्तीने आपले भविष्य खोटे ठरणार नाही असा निर्वाळा दिला.पुढे विद्याची मुलगी १२ वर्षाची झाल्यावर अचानक दोन दिवस ताप येऊन कोमात गेली आणि आठवड्यातच तिचा दुःखद अंत झाला.विद्या त्यातून कशीबशी सावरली पण त्यानंतर तिच्या नवऱ्याने परत शस्त्रक्रिया करून पुन्हा त्यानी एक संधि घेतली आणि यावेळी तिला मुलगा झाला आणि भविष्य असे खरे ठरले.
२)डॉ‌. श्रीकांत मुंदर्गी हे एक लेखकही आहेत.त्यानी स्वतःच्या लग्नाविषयी एक कथा (अनुभव कथन)लिहिली आहे त्यात त्यानी प्रथम पसंत केलेल्या मुलीशी   लग्न करू नये असा आग्रह त्यांच्या आईने धरला कारण त्या मुलीला अकाल मृत्युयोग आहे असे त्यांच्या ज्योतिष्याने सांगितले होते.ड़ॉक्टरांचा मात्र ज्योतिष्यावर विश्वास नसल्याने त्यानी करीन तर तिच्याशीच  असा हट्ट धरला यावर त्यांच्या आईने तिच्याशी लग्न केलेस तर मी घर सोडून जाईन अशी धमकी दिली,त्यामुळे नाइलाजाने त्याना दुसऱ्या मुलीशी लग्न करावे लागले.त्यांच्या लग्नानंतर दोनच वर्षानी त्यानी प्रथम पसंत केलेल्या मुलीचे अपघाती निधन झाले.
३)तिसरा अनुभव माझा स्वतःचाच आहे.माझ्या अमेरिकेत रहाणाऱ्या मुलाला मुलगा झाल्यावर त्याची पत्रिका माझ्या पत्नीने (तिचा या गोष्टीवर विश्वास आहे)पहिल्या अनुभवात उल्लेखलेल्या व्यक्तीला दाखवली तेव्हा त्या मुलाच्या पाठीवर मोठा काळा डाग असेल असे त्यानी सांगितले तोपर्यंत आम्ही पण नातवाला पाहिले नव्हते,त्यामुळे मुलाला फोन करून विचारले असता तसा डाग खरोखरच आहे असे त्याने सांगितले.
        असे आणखीही काही अनुभव आहेत जे मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत असल्यामुळे बऱ्याच मनोगतीनाही माहित असतील.उदा‍. जॉन.एफ्.केनेडी  अथवा  बालकवी ठोमरे यांच्या मृत्युविषयी भाकित. या बाबतीत आपल्याला न कळणाऱ्या गोष्टींबाबत आपण मौन पाळावे या मताचा मी आहे.