तुम्ही कंटाळलात आणि उठून गेलात. तुम्हाला कथा मिळाली नाही. तुम्ही ज्या अपेक्षा घेऊन आला होतात त्या पूर्ण झाल्या नाहीत.  यावर मी काय उत्तर देणार?  कथा सांगणे हा माझा हेतूच नाही तर तुम्हाला कथा मिळाली नाही त्यात नवल काय? माझा हेतू अनुभव देणे आहे आणि ते मी निवेदनात, पत्रकात स्पष्ट केले आहे. फक्त अनुभवाच्या पातळीवर एखादी कलाकृती अनुभवणे हे आपल्या प्रेक्षकांना सवयीचे नाही याचीही कल्पना आहे. कविता म्हणजे अश्या अश्या पद्धतीनेच जायला हवी किंवा अशीच सादर व्हायला हवी. प्रत्येक कार्यक्रमात निवेदनातून सूत्र/कथा सांगितली जायला हवी वगैरे वगैरे अपेक्षा मला पटत नाहीत. तसेच तुमच्या बरोबर विरूद्ध टोकाच्याही प्रतिक्रिया माझ्याकडे आहेत अगदी त्याच प्रयोगाच्या सुद्धा. जो अनुभव देणे मला करायचे होते तो पोचला अश्या प्रतिक्रिया आहेत. काही जणांनी अतिउत्साहात असं काही आधी कधी पाह्यलंच नव्हतं असंही येऊन सांगितलय.

सर्वच प्रतिक्रियांवर उत्तर काय देणार मी? मी जे काही केले आहे ते महान कलाकृती या विशेषणाला पात्र नाही याची कल्पना आहे पण टाकाऊ यालाही पात्र नाही एवढा मला विश्वास आहे. मी जे काही केले आहे ते प्रामाणिकपणे आणि कॉन्फिड्न्टली केले आहे. कुठलीही गणिते मांडलेली नाहीत. बस्स् इतकेच.

आणि खरंच माफ करा पण पहिल्या १५ -२० मिनिटातच उठून गेला असाल तर आपल्या प्रतिसादाला कितपत महत्व मी द्यावे?

मी स्वतः कुठलेही नाटक /  प्रयोग पहाताना पूर्ण पाह्यल्याशिवाय मला त्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही हे मानते / पाळते. इतरांनी तसेच करावे अशी अपेक्षा नाही पण प्रतिसाद कुठला घ्यायचा आणि कुठला नाही ह्यासाठी ही गाळणी मी लावणारच.

>>मी देखील अनेक नाटकातून, विषेशता साहित्य संघ मंदिराच्या, काम आणि नेपथ्य करतो. यंदाच्या राज्यनाट्य स्पर्धेत आम्हाला ६ बक्षीसे मिळाली आहेत.<<
आपले अभिनंदन पण या उल्लेखाचे प्रयोजन समजले नाही.

राग येण्याचा प्रश्नच नाही कारण काम करत असतानाच सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचा विचार करून काम केले आहे. प्रतिक्रियांचा विचार करून म्हणजे त्या प्रतिक्रिया टाळण्यासाठी आपल्या कामाशी तडजोड असे नाही. असो..

नीरजा