सर्व मानसशास्त्रज्ञांचे यावर एकमत आहे की या दडपलेल्या इच्छा नष्ट होत नाहीत
कामप्रेरणेसारख्या नैसर्गिक भावनांचा स्वीकार आणि त्यांचा  निचरा होण्याची गरज हे स्वीकारायला एक सामाजिक मोकळेपणा लागतो. भारतासारख्या नैतिकतेच्या दुटप्पी कल्पना बाळगणाऱ्या देशात त्यांचा जाणवण्याइतपत अभाव आहे. कामेच्छा ही नैसर्गिक प्रेरणा असली तरी बलात्कार ही निश्चितपणे विकृती आहे. नैसर्गिक प्रेरणांचे तात्काळ शमन हे बहुदा अशक्यच असते. पण संयम आणि विवेकाने या प्रेरणांचे विकृतीमध्ये रूपांतर होण्यापासून स्वतःला रोखून धरता येते. नाहीतर उद्दीपन आणि त्याचे ओरबाडून केलेले शमन याला कुठे अंतच रहाणार नाही. भारतासारख्या देशात लैंगिक उपासमार आणि कामवैफल्याने ग्रस्त लोकांची संख्या ( होय, यात पुरुष व स्त्रिया दोन्ही आले!) खूप आहे. पण याचबरोबर पुरुषी वर्चस्वाच्या चुकीच्या कल्पना आणि कायद्यातल्या पळवाटांमुळे शिक्षेची अंमलबजावणी होण्याचे अत्यल्प प्रमाण हे बलात्कार होण्याचे प्रमुख कारण आहे. बलात्कारित स्त्रिया / कुमारी / काही काही प्रसंगात बालिका यांची वेशभूषा हा त्या मानाने अगदीच नगण्य मुद्दा वाटतो. भारतात आणि परदेशात, विशेषतः पाश्चिमात्यदेशांत, होणारे स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि बलात्कार यांचे प्रमाण लक्षात घेतले तर हा मुद्दा स्पष्ट होईल.
दुसरी गोष्ट अशी की भारतात होणारे बलात्कार हे बऱ्याच वेळा परिचित व्यक्तींद्वारा - नातेवाईक, नेहमी घरी येणारे लोक, काहीकाही घृणास्पद वेळा जन्गदाता बाप -केले जातात. अशा वेळी या दुष्कृत्त्यांमध्ये  वेशभूषेसारख्या तात्कालिन उत्तेजनेचा वाटा अगदीच नगण्य असतो.