प्रथमच सांगितल्याप्रमाणे हा माझा अंदाज आहे. पण अगदीच पोकळ नाही... विश्वमोहिनी यांनी चालना दिल्यामुळे मनात सुरू झालेली ही एक विचारप्रक्रिया आहे...
- विश्वमोहिनी आणि मिलिंद जोशी यांच्या मतांमधील समान धागा पाहायचा झाल्यास मला असे दिसते की ग्रहगोल माणसाच्या आयुष्यातील घडामोडींवर परिणाम करू शकण्याच्या बाबतीत अगदीच कुचकामी आहेत.
- फलज्योतिषावर आधारित उपाय हे विविध ग्रहांची शांती या सदरातील असतात. ही मंडळी एकतर फसवणूक करीत असतात. तशी फसवणूक करण्याचा घाट न घातलेलेही बरेच फलज्योतिषी मला माहीत आहेत. त्यांच्या डोक्यांत मात्र ग्रहांचा आणि मानवी जीवनाचा कारण-परिणाम असाच संबंध असतो; केवळ कोरिलेशनचा नाही.
- फलज्योतिष हे माझ्यामते संख्याशास्त्रातील कोरिलेशन वा परस्पर संबंधाचे फलित आहे.
तपशीलांत शिरत नाही... परंतु जो -- गणिताचा! फलज्योतिषाचा नव्हे -- अभ्यास आहे त्याच्या पाठबळावर असे वाटत नाही की संख्याशास्त्रातील कोरिलेशन वा परस्पर संबंधाच्या निकषांवरही फलज्योतिष टिकेल! कोरिलेशन हे जरी दोन घटनांमधील कारणमीमांसा पुरवित नसले तरीदेखील कोरिलेशनवरून त्या दोन घटनांवर भरवसा का ठेवावा याबाबत मात्र सबळ कारणमीमांसा देते. विश्वमोहिनी यांनी विषयविस्तार केल्यास नक्कीच अभ्यास करायला आवडेल.
- वादासाठी फलज्योतिष हे कोरिलेशन या प्रकारांत मोडते असे गृहित धरले तरीदेखील एकूणच या कोरिलेशन प्रकाराचे पुढे होऊ घालणाऱ्या घटना सांगण्याचे सामर्थ्य कमालीचे तुटपुंजे राहते. फलज्योतिषाचे उद्दिष्ट्य "कोट्यावधी माणसांच्या आयुष्यातील प्रमुख घटना" सांगणे असे ढोबळपणे म्हणू या. काही हजार वर्षांपूर्वीच्या -- वादासाठी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मांडलेल्या -- कोरिलेशनवर आजचे निकष काढणे हे कोरिलेशन शास्त्र सुचविणे अशक्य आहे.
- आणखीही एक विचार बऱ्याच वेळा दिसतो. (सदर चर्चेत तो ठळकपणे दिसलेला नाही... पण अगदी अश्याच स्वरूपाच्या इतर चर्चांमध्ये हमखास डोकावतो.) हे शास्त्रच होते; परंतु नंतरच्या काळात त्यापातळीवर अभ्यास/चिकित्सा न राहिल्याने केवळ आता ते तसे राहिलेले नाही इतकेच.
त्यावर अशी भूमिका घेणे श्रेयस्कर - भूतकाळातही हे थोतांड होते की शास्त्र हे दोन्ही बाजूंनी जरा बाजूला ठेवावे. त्यानंतर मात्र आजच्या काळात जे फलज्योतिष राहिले आहे ते निव्वळ थोतांडच आहे... यावर एकमत नसले तरी बहुमत होण्यास हरकत नसावी.
अर्थात भावनिक/राजकीय/इतरही अनेक पातळ्यांनुसार थोतांडाची व्याख्या कशी करायची; कोणते शब्दप्रयोग वापरायचे; की मौन पाळायचे हे ज्याने-त्याने ठरवावे!!