ज्यावेळी एखादा पुरुष सिनेमाच्या पडद्यावर अथवा दूरदर्शनवर अथवा प्रत्यक्षांत रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी स्त्रीचे अंगप्रदर्शन बघतो त्यावेळी निसर्गतःच त्याची कामेच्छा उद्दीपित होते पण नैसर्गिक कृतीने तिची ताबडतोब पूर्तता करणे परिस्थितीमुळे किंवा सामाजिक दडपणामुळे शक्य नसते. त्यामुळे ती इच्छा दडपून टाकली जाते. सर्व मानसशास्त्रज्ञांचे यावर एकमत आहे की या दडपलेल्या इच्छा नष्ट होत नाहीत. फक्त त्या जाणीवेंतून नेणीवेंत जातात. असे बाह्य जगतांतून कामेच्छा उद्दीपित करणारे आघात एकसारखे होत राहिले (आणि आजकालच्या जगांत असे आघात वारंवार होत असतात) व इच्छापूर्ति लांबणीवर पडत गेली की दडपलेल्या इच्छेचा दाब वाढत जातो व बाह्य जगांतील एखाद्या लहानशा आघातामुळेही ती अपुरी इच्छा साचलेल्या पूर्ण शक्तीनिशी नेणीवेंतून जाणीवेंत येते व पूर्णपणे जाणीव व्यापून टाकते. कामेच्छापूर्तीची निकड निर्माण होते. तिचे सावट माणसाच्या विचारशक्तीवर पडते. या शुद्ध-बुद्ध हरपलेल्या अवस्थेंत सारासार विचार नष्ट होतो व धोकेही ल्क्षांत येत नाहीत. (कामातुराणां न भयं न लज्जा). त्यांतूनही इच्छापूर्तीसाठी सर्वच पुरुष बलात्काराचा मार्ग अवलंबतात असे नाही. काही दिवास्वप्नांत दंग होऊन आपली इच्छा पूर्ण करतात. फार थोडे कलानिर्मिति करतात. तर काहीजण त्यांतल्या त्यांत त्या अवस्थेंत सुरक्षित वाटणारा मार्ग शोधतात व जी स्त्री सहजसाध्य वाटते तिच्याकडून तिच्या संमतीची पर्वा न करता इच्छा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी या माणसांच्या जाणीवेवर इच्छेचा एवढा जबरदस्त पगडा असतो की स्त्रीचे मन तर सोडाच पण तिचे वास्तव स्वरूपही त्यांना दिसत नाही.

हे खरे नाही... किंवा तशी माहिती गोळा केलेली नसल्याने स्वतःच्या अनुभवावरून सांगायचे तर नक्कीच नसावे असे माझे ठाम मत! त्यामुळे त्यापुढील विवेचनांस आधारच नाही असे वाटते.

दैनंदिन व्यवहारात अनेक रूपसुंदर युवतींशी गाठ पडते... (तशी प्रत्येक युवती ही सुंदरच असते हे माझे मत!!); पण भेटण्याचे निमित्त्य संपल्यानंतर तिच्या अंगप्रत्यंगाचे काय दर्शन अथवा प्रदर्शन चालले होते हे आठवूनही सांगता येत नाही. नेणिवेमध्ये काही विचार राहणे तर फारच दूरची गोष्ट!

पाहणाऱ्याच्या मनावर होणारा विकृत परिणाम हा समोरच्या व्यक्तीने कोणते कपडे घातले आहेत याचा नसून त्याच्या/तिच्या मनातील गुंत्याचा अधिक आहे.