ज़रा ज़रा हे बॉम्बे जयश्री यांनी गायिलेले सुंदर गाणे नेहमीच्या आवाजातले आहे. फ़ाल्सेटो आधीच म्हटल्याप्रमाणे ऐकायला चांगला वाटत नाही (यावरून मला भलतीच शंका आलीः ते गाणे आपल्याला आवडत नाही की काय? तसे नसावे ही आशा आहे) आणि त्यामुळेच बहुतेक कुठलेही रेकॉर्डिंग फ़ाल्सेटोमध्ये असण्याची शक्यता वाटत नाही. म्हणून उदाहरण देणे कठीण आहे.
पण त्यातल्या त्यात स्पष्टीकरण/उदाहरण द्यायचे तर असे सांगता येईल की किशोर "यूडले-ई" करतो त्यातल्या "यूडले" इथपर्यंत नेहमीचा आवाज व "ई" हा फ़ाल्सेटो असतो.
आपण स्वतः गाताना वरवर स्वर नेत गेलो की ठराविक बिंदूच्या पुढे जाऊ शकत नाही, तरीसुद्धा रेटून आणखी वर जायचा प्रयत्न केला की गळ्यातून जो निघतो तोच फ़ाल्सेटो. काही वेळा आवाज वर जात नसला की वेळ मारून नेण्याचा मार्ग म्हणून गायक/गायिका फ़ाल्सेटोचा आसरा घेतात, पण ते योग्य नाही.
चुकून जरा जास्त वरची पट्टी निवडून गाणे सुरू केल्याने असा अनवस्था प्रसंग येतो. तुमच्या ध्यानात आले असेल की (अशास्त्रीय संगीताच्या) कार्यक्रमात गाणे सुरू करण्यापूर्वी क्षणभर आधी कॅसिओ-सहवादक एक "कॉर्ड" देतात / वाजवतात - त्यावरून क्लू घेऊन गायकाने गाण्याचा पहिला सूर पकडायचा असतो. काही गायकांना हे जमत नाही, ते वेगळ्याच सुरात सुरू करतात व शेवटी बरेच वेळा वरील प्रसंग घडतो. किंवा गायकाने कडवे वेगळ्याच (म्हणजे खालच्या) पट्टीत घेतले तर तो वाचतो, पण शोभा व्हायची ती होतेच (कधीकधी हे श्रोत्यांना कळत नाही एवढेच). अशा वेळी सह-वादक एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसतात. [कुठल्याही स्थानिक मल्टिस्टार कार्यक्रमात एखाद्या गायकाची अशी पट्टी चुकणे हे नेहमीचेच आहे] 
कधीकधी लोकनाट्य शाहीराच्या गाण्याला किंवा लावणीला साथ करणारे झीलकरी फ़ाल्सेटोमध्ये गात असावेत (आठवाः- आशाच्या "झोंबतो गारवाऽऽ हा-आऽऽ" नंतर लगेच अतितार स्वरात मागे कोरस "झोंबतो गारवा, खरंच हिला..." वगैरे म्हणतो ते).
एकूण फ़ाल्सेटोबद्दल फार चर्चा (तीसुद्धा प्रात्यक्षिकाशिवाय) करण्यात सध्या काही हशील नाही असे वाटते.
दिगम्भा