द्वारकानाथजी,
आपला उदात्त हेतु पाहून मन उल्हासित झाले. मी सुद्धा तुमच्यासारख्याच विचारात असतो. माझ्या अनुभवातून मला जे शिकायला मिळाले ते तुम्हाला सांगतो.
मराठी पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत का घालतात याचे मूळ प्रथम शोधून त्यावरच घाव घातला तर?
मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यामागे साधारणतः ही कारणे असतात:
१. इंग्रजीशिवाय भविष्यात सत ना गत अशी पालकांची समजूत असते. जर मुलांना पुढे इंग्रजीतूनच उच्चशिक्षण घ्यायचे असेल तर अत्तापासूनच इंग्रजीत शिकवले म्हणजे पुढे त्रास होणार नाही असा त्यांचा विचार असतो.
२. मुलाला भविष्यात रोजगारासाठी जागतीक स्पर्धेशी व्यवस्थित मुकाबला करता आला पाहिजे. त्यासाठी वापरल्या जाणार्या भाषेत जर आपला बंड्या पारंगत असेल तर त्याचा हा "प्लस प्वाइंट" नव्हे का, असाही त्यांचा स्वर निघतो.
३. आजूबाजूचे माहीतीतले सगळे जण त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मी जर याला मराठी शाळेत घातले तर मोठा झाल्यावर हा मलाच दोष देईल. अशी भिती पण पालकांना असते.
४. मोठेपणा! या फॅशन-फॅडा मुळे पण पालक मुलांना मराठी शाळेत घालायला कचरतात.
वरील मुद्द्यांच्या मुळावर घाव घातला आणी हे सगळे चूक समज आहेत हे जर आपण पटवून देऊ शकलो तर पालक मुलांना मराठी शाळांमध्ये घालतात हे मी स्वानुभवाने सांगतो आहे.
वरील प्रश्नांवर उपाययोजण्यासाठी खालील युक्तीवादांचा मी उपयोग करतो.
इंग्रजी भाषा भविष्यात उपयोगी आहेच. तिचा वापर उच्चशिक्षण व रोजगारासाठी होणारच आहे. आणी म्हणूनच मराठी माध्यमातील शिक्षणक्रमात सुद्धा इंग्रजी आहे. उलट मराठी माध्यमातील मुलांना ज्ञान त्यांच्या मातृभाषेत मिळत असल्याने समजून घ्यायला सोपे जाते कारण "मातृभाषा हीच ज्ञानभाषा असेल तर ज्ञान कमी वेळात आवगत होते" असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
आता हेच पहा ना. मराठी शिकताना आपण वांग्याचं भरीत, लाल मातीतली कुस्ती, कोशिंबीर, हनुमान या गोष्टी नकळत शिकतो पण जर एखाद्या इंग्रजांना या गोष्टी समजाऊन घ्यायच्या तर त्यांना अगोदर आपली संस्कृती समजाऊन घ्यावी लागते. नाहीतर हनुमानाचा monkey God आणि "बोलून चालून शिवाजी राजा होता" चा "walking talking shivaji was a king" असा सरळ अनर्थ त्यांच्या कडून सहज होऊ शकतो.
त्याच प्रमाणे इंग्रजी भाषेतून शिकताना little match girl एका रात्री घराबाहेर राहीली तर का मेली असेल बरे हे समजाऊन घेताना बर्फाळ थंडी माहीत नसलेला मराठी विद्यार्थी गोंधळून जाणारच. आणी गोंधळलेल्या मानसिकतेत मुलांचा विकास म्हणावा तसा होत नाही.
ह्या विधानांना सोदाहरण पटवून देताना मी म्हणत असतो, "उलट हेच पहा ना आमच्या वर्गात शिकलेला विजय पुकाळे, आता इस्त्रोमध्ये सायंटीस्ट झालाय, तो अभय रिसर्च लीड झालाय. आणी आमच्या शेजारचा *** हा लहानपणापासून इंग्रजीत शिकला आणी आता निव्वळ स्लँग इंग्रजीतली पुस्तके वाचत असतो. त्याला गतीविषयक न्युटनचा नियम कुठे वापरतोस सांग म्हटले तरी जमत नाही. सांगणार तरी कसा, त्याला तरी तो समजायला हवा ना! हाय फाय इंग्रजीतून शिकवले आणी यांच्या डोक्यावरून गेले. तसा हा फार हुशार, पण मराठी-इंग्रजीच्या गोंधळात पार गेला हो! म्हणून तर मी आमच्या पुतणीला, भाच्यांना आणी ओळखीच्या मुलांना मराठी शाळेतच घालायला लावले. तुम्ही सुद्धा विचार करून बघा बरं!"
पालकांना हे पटवून देण्याचे काम फार जिकीरीचे जरी असले तरी बरीच मंडळी त्यावर विचार करतात. शेवटी त्यांच्यातसुद्धा मराठी प्रेम असतेच ना! त्यामुळे अशादायी निर्णय ते घेऊ शकतात.
अता प्रश्न पडतो की पालकांना गाठायचे कुठे? सोपे, शाळांमध्ये सतत कसले-कसले कार्यक्रम सुरु असतात. चिकार पालक सापडतात तिथे! आणी एरव्ही कसल्याही सामाजीक मुद्द्यावरच्या विषयांकडे डोळे झाक करणारे सुद्धा असल्या जिव्हाळ्याच्या विषयावर खुलून बोअतात.
आपण सर्वांनी दर आठवड्याला एका पालकांचे मत बदलण्यात जरी यशस्वी झालो तरी वर्षाला पन्नासेक विद्यार्थ्यांना (व पर्यायाने उद्याच्या मराठी पिढीला) मराठी शाळेत वळवल्याचे समाधान मिळेल.