गुरुगृहीचा सकस संगीत आहार मनसोक्त लाभल्यामुळे तात्या बरेचसे कट्टर बनले आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या जागोजागच्या संगीत अन्नछत्रात मिळालेल्या अन्नावर वाढलेल्या पोरांबद्दल त्यांना कितपत सहानुभूती वाटेल याची शंकाच आहे. तरीही गुरूंकडून विद्या मिळण्याचे भाग्य ज्यांना लाभले त्यांना माझे प्रणाम.
ते काही असो, गुरुमुखी विद्या घेतलेले गणंगही मी कमी पाहिलेले नाहीत
शेवटी विद्या ही विद्यार्थी घेईल तेवढीच मिळते हे खरे. आणि काही विद्यार्थी गुरूंचा उदरनिर्वाह करण्यापुरतेच कामी येतात हेही तितकेच खरे.
मी ऐकलेला एक "झेन" बोध सांगावासा वाटतो -
विद्यार्थ्यांचे तीन प्रकार असतात. पहिल्या व सर्वात कमी दर्जाचे विद्यार्थी आपण या-त्या गुरूकडे शिकलो असे सांगून जगात मिरवतात किंवा जगात गुरूचे नाव सांगून स्वहित साधतात. दुसऱ्या प्रकारचे, पहिल्यापेक्षा थोडे श्रेष्ठ असतात ते, रडत-कढत शिकतात पण गुरू आपल्याला कसा बोलतो, कसा मारतो याचे गाऱ्हाणे गात इकडे तिकडे फिरतात. तिसरे व सर्वात श्रेष्ठ दर्जाचे विद्यार्थी, गुरू हिडीसफिडीस, मारहाण करतो त्याची वाच्यता न करता त्या शिव्या, तो मार खात खात अधिकाधिक सशक्त, विद्यावान व कर्तबगार बनत जातात व एके दिवशी स्वतः गुरू बनण्याच्या योग्यतेचे होतात.
जाता-जाताः कुणी सांगावे आजकालचे किती गुरू स्वतः चांगल्या गुरूंकडे शिकलेले असतील व किती असेच विशारद वगैरे केलेले असतील. गुरूंमध्येही चांगले-वाईट असतात. असल्या संशयास्पद गुरूंच्या मुखातून विद्या मिळणारे विद्यार्थी व सरळ विशारद करणारे विद्यार्थी यात कोण श्रेष्ठ हे कसे ठरवायचे?
(मी आपला संगीतातल्या खालच्या जातीचा, त्यामुळे नम्र)
दिगम्भा