स्वतः एक शेतकरी म्हणून मी थोडासा सविस्तर प्रतिसाद देतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासाठी शेतीचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न आणि त्यासाठी अनिश्चित पाऊस असे आणि इतके सोपे हे समीकरण नाही. हा प्रश्न त्याहून अधिक जटील आणि गुंतागुंतीचा आहे. कर्जबाजारी शेतकरी हे हिमनगाचे टोक आहे. समजा आज शेतकऱ्यांना असलेली सगळी कर्जे माफ करून टाकली, आणि कोरडवाहू प्रदेशातील जमीन ओलीताखाली आणली तर कदाचित शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, पण त्यामुळे शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होईल असे नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बरीच शेतजमीन ओलिताखाली आहे, पण तिथल्या शेतकऱ्याची अवस्थाही 'खाऊनपिऊन सुखी' यापेक्षा अधिक चांगली नाही. ( अपवाद वगळता)
याची कारणे शोधू जाता ती खालीलप्रमाणे आहेत असे ध्यानात येतेः

  1. शेती ही परंपरा म्हणून करणे.-व्यावसायिकतेचा अभाव
  2. सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी
  3. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा - शिक्षणाचा - अभाव
  4. अस्थिर बाजारपेठ
  5. शेतीमाल प्रक्रिया आणि निर्यात यात झालेली अगदीच नाममात्र प्रगती
  6. शेती जोडधंद्यांच्या प्रचारात अपयशी ठरलेले धोरण
  7. शेतीसंबंधातील 'हस्तीदंती मनोऱ्यात'च सीमित राहिलेले संशोधन
    यातील प्रत्येक मुद्द्यावर एक स्वतंत्र लेख लिहीता येईल, पण ते हे स्थळ नव्हे.
    शरदराव, थोडे स्पष्ट बोलतो, माफ करा, पण आपण सुचवलेले उपाय हे मला बालीशपणाचे वाटतात. अशा कोणत्याही जादूच्या कांडीने भारतीय शेती नफादायी होणार नाही.
    पावसाळ्यांत शेती न करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे शेतांत काम करणाऱ्याला भर पावसांत व चिखलांत काम करावे लागणार नाही.
    अहो, पावसात काम करण्याचे काय सांगता? परिस्थितीने चिणून गेलेल्या शेतकऱ्याला मृत्यूला जवळ करावे असे वाटायला लागते तेंव्हा त्याच्या सर्व वाटा बंद झालेल्या असतात. आला दिवस जगता आला तर नशीब अशी मनस्थिती झालेल्या शेतकऱ्याला कसेही करून जगता आले तर ते पाहिजेच असते. ते जेंव्हा असह्य होते तेंव्हाच तो आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे असे कोणतेही वरवरची मलमपट्टी करणारे उपाय म्हणजे 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' असा प्रकार आहे.
    असो. एका वेगळ्या विषयावर लिहिल्याबद्दल आभार. 'मनोगतीं' ना हा विषय कितपत रुचेल माहिती नाही, पण आपल्याशी या विषयावर चर्चा करायला मला आवडेल.
    सन्जोप राव