मोठा जिव्हाळ्याचा विषय इथे सुरू केल्याबद्दल धन्यवाद. शीर्षकावरून अपारंपारिक शेतीबद्दल विशेष माहिती मिळेल असे वाटले होते. माझ्या पारंपारिक डोक्यात शेतीच्या अपारंपारिकतेबद्दलची कल्पना थोडी वेगळी होती, जशी मत्स्यशेती, गांडूळखत, मृदसंधारणाच्या काही नविन पद्धती, सिंचनाच्या अपारंपारिक पद्धती, पाणी अडवा- पाणी जिरवा वगैरे. पण इथल्या कल्पना वाचून थोडे विचित्र वाटले.
महाराष्ट्रीय शेतीपद्धतीत खरीपाचा आणि रब्बीचा असे दोन हंगाम असतात. या दोन्ही हंगामांवर शेतकऱ्याचे वर्षभराचे जमाखर्चाचे कॅलेंडर बेतलेले असते. पावसाळ्यात शेती न करणे हा पर्याय होऊ शकत नाही. हे म्हणजे मुंबईत जुन-जुलै महिन्यात खूप पाऊस पडतो म्हणून मुंबईकरांना सुट्ट्या द्याव्या म्हणण्यासारखे आहे. पावसाळ्यात शेतीच केली नाही तर त्या हंगामातील शेतकऱ्याचे (जे काही) उत्पन्न आहे ते ही त्यास मिळणार नाही!
आपल्याकडे साधारणतः २ प्रकारांची शेती आहे. कोरडवाहू आणि ओलिताची. कोरडवाहू प्रकारात पाण्याचे नियोजन सर्वस्वी पावसावर अवलंबून असते. माळरानावरील , खडकाळ जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता तशीच कमी असते. तसेच भूजलाची पातळीसुद्धा अधिक खोल असते. त्यामूळे एक पावसाळा सोडला तर इतर मोसमात शेतकऱ्याला पाणी कुठून मिळेल?

समुद्राच्या पाण्यावर शेती करावी - > ही आयडिया मला फ़ार आवडली. विदर्भात आणि मराठवाड्यात विशेषतः उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. तिथे कोकणाच्या किनारपटीवरुन पाइपलाइन टाकून पाणी शुद्ध करुन पोहोचवावे. फार चांगले होईल. (या साठी खर्च किती लागेल, आज सुरुवात केली तर एकन्दरीत किती वर्षांत असा प्रकल्प पूर्ण होईल ... तो पर्यंत अजून किती शेतकरी आत्महत्या करतील तेही सोबत सांगावे.) यापेक्षा एक नद्याजोडणी प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळत आहे, तो पूर्ण झाला तर थोडाबहुत फायदा होऊ शकेल असे वाटते.