साखरेच्या अर्धे पाणी घ्यावे. मध्यम आंचेवर गरम करावयास ठेवावे.

१) साखर विरघळली आणि साधारण पहिली उकळी आली की साखरेचे जे द्रावण तयार होते तो 'कच्चा पाक'

२) ते मिश्रण तसेच उकळत ठेवले की त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पाक जरा घट्ट होतो. ह्या पाकाचा एक थेंब अंगठा आणि तर्जनीमध्ये धरावा. आता ही चिमुट किंचित उघडली (म्हणजे दोन्ही बोटे जरा अलग केली) की पाकाची, दोन्ही बोटांमध्ये, एक 'तार' होते. हा 'एक तारी' पाक.

३) हा पाक तसाच पुढे शिजवत ठेवला तर पाणी बरेच आटून वरील पद्धतीने चिमटीत पकडून अलग केलेल्या बोटांमध्ये दोन (किंवा अधिक) तारा दिसतात ह्याला 'दोन तारी' पाक किंवा 'पक्का पाक' असे म्हणतात.

कच्चा पाक रसगुल्ले, रव्याचे, बंदीचे लाडू ह्यात वापरतात.
'एकतारी पाक' वड्यांसाठी, गुलाबजाम साठी आणि
'पक्का पाक' काजूच्या चिक्कीत वगैरे वापरतात.
'पाकाच्या' वेगवेगळ्या पदार्थातील वापराबद्दल कडक कायदे कानून नाहीत पण पाक जसजसा घट्ट होतो तसतसा अंतिम पदार्थ 'कडक' होतो.