ह्या गझलेचे अन्त्ययमक 'दे' आहे. कवी प्रत्येक ओळीत कवीला ती क्रिया करण्याची आडकाठी आहे आणि त्यासाठी तो परवानगी मागतो आहे, असे वाटते.


खरे तर इथे दे ऐवजी या हे रदीफ आले असते तर खरे रोमँटिक वाटले असते.
दिवे,चंद्र,तारे अता मालवू या
नव्या जीवनाची निशा ज़ागवू या
अर्थ बदलतो आहे. मला हे म्हणायचे नव्हते. असे कवी म्हणू शकतो.:) असो.

'लाजवू दे' ह्या वापराबद्दल मी एका विदुषींना विचारले असता त्यांनी खालील उत्तर दिले, जे पटते--

कर्मणी क्रियापद असेल तर लाजवू दे व्याकरणदृष्ट्या बरोबर होईल. मात्र अभिप्रेत अर्थाच्या दृष्टीने लाजू दे हे योग्य. लाजू दे मध्ये लाजणे आहे. लाजवू दे मध्ये लाजवणे आहे. लाजवणे चा अर्थ लाज आणणे जो नकारात्मक घेतला जातो. पाहुण्यांसमोर दंगामस्ती करून मुलाने मला लाज आणली. ह्यामध्ये मी लज्जित होत नसते तर शरम+राग असे मिश्रण असते. तसे हे लाजवणे वाटले. दीप मालवू दे, डास घालवू दे ह्यामध्ये मला जी गोष्ट करायची आहे त्यात तू आडकाठी आणू नको असा अर्थ असतो. त्यामुळे लाजवू दे मध्ये १. मला लाजायचे आहे, तू आडकाठी करू नकोस २. त्यांच्या मिठीने मला (तुला) लाजवायचे आहे, असे दोन अर्थ निघतात, जे दोन्ही अपेक्षित अर्थ नाहीत असे वाटते.

ह्या आधीच मुद्दे (ओघवतेपणा वगैरे) आता पुन्हा चघळत बसत नाही. तुम्हाला त्या ओळींत अगोड, अजीर्ण वाटलेले नाही, खटकलेले नाही. प्रश्नच मिटला. शब्दांचा क्रम इत्यादी बाबतींतही म्हणून मी वाद घालत बसत नाही. माझेच कान जास्तच संवेदनशील असावेत.

असो, एकंदर मला जे खटकले ते तुम्हाला अजिबात खटकत नाही आणि तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते कळत नाही, हे माझे दुर्दैव. त्यामुळे विचारगुरुत्वावरील चर्चा तूर्तास तहकूब करतो. :)

पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.