सदर चर्चा खालील बातमीशी संबंधित आहे का?
सकाळ
५ जुलै २००६
सहनशीलतेचा अंत नको - शालिनीताई
सातारा, ता. ४ - अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. मात्र, प्रत्येक तालुक्यात आंबेडकर भवन आणि मागासवर्गीयांसाठी वसतिगृहे उभारण्यासाठी पैशाची तरतूद केली जाते. आता सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी आज दिला. ....
...... येथील कोडोली ग्रामस्थ आणि विविध संस्थांच्या माध्यमातून कोडोली येथे आज आमदार पाटील यांचे जाहीर व्याख्यान व मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, जयवंत गुजर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ताईंचे भाषण ऐकण्यासाठी सभागृह खचाखच भरून गेले होते. भरपावसात उभे राहून नागरिक ताईंचे भाषण ऐकत होते. आर्थिक आरक्षणाच्या भूमिकेवर मी ठाम आहे. मागासवर्गातील गरिबांना आरक्षणातून वगळा, असे मी म्हटलेले नाही. जातीधर्मा पलीकडे जाऊन ज्यांना सवलतीची गरज आहे. त्यांना आरक्षण देण्याची मी मागणी करत आहे. कोणा गरिबाच्या ताटातला खास काढा, असे मी म्हटलेले नाही. मात्र, ज्यांना माझी भूमिकाच समजलेली नाही ते उगाच दंगा करत आहेत. आपल्याला धक्का बसेल का, या विचाराने दंगेखोर अस्वस्थ झाले आहेत. त्याला महत्त्व द्यायची गरज नाही, असे सांगून पाटील म्हणाल्या, ""मी एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात भडकावत नाही. समोरचा कसाही वागला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करा, असेच मी सांगत आहे. अन्याय करणे अयोग्यच आहे. मात्र अन्याय सहन करणे हेही अयोग्य आहे. गेली ६० वर्षे आम्ही सहन करीत आहोत. आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.''
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला आदरच आहे; पण सरकारने आवश्यक गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. आंबेडकरांपेक्षा मोठा कोणी झालाच नाही का, असा प्रश्न करून त्या म्हणाल्या, ""त्यांचे स्वातंत्र्य मिळविण्यात योगदान तरी आहे का? घटना काही एकाने लिहिलेली नाही, तरीही मी घटनेचा आदरच करते आहे. मात्र,१९५३ मध्ये घटना जाळून टाका, असे बाबासाहेबच म्हटले होते. मात्र मी तसे म्हणणार नाही. ५० वर्षांत ८० वेळा घटना बदलली आहे. आणखी एकदा बदल व्हायला काय हरकत आहे. माझी भूमिका आता सर्वांना पटू लागली आहे. महाराष्ट्रात या विचाराचा रेटा तयार झाला तर घटनेत सहज बदल होऊन जाईल आणि इतर राज्यातही त्याचे अनुकरण होईल.''
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आघाडी सरकारच्या जाहीरनाम्याबाबत त्या म्हणाल्या, ""आर्थिक निकषावर आरक्षणाचे आश्वासन दिले होते; परंतु दोन वर्षे झाली, तरी वचनाची पूर्ती होत नाही. मला सरकार पुढे नवा कार्यक्रम ठेवायचा आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुविधा जरूर द्या. मात्र ते तरीही रेषेच्यावर जात नसतील तर त्यांना उच्च शिक्षणासाठी आरक्षण कशाकरिता. उच्च शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण गुणवत्तेवरच मिळाले पाहिजे. बलशाही भारताचे स्वप्न पुरे करायचे असेल तर तरुणांच्या गुणवत्तेचा उपयोग करून घेतला पाहिजे. मागासवर्गीय विद्यार्थ्याला मोफत पुस्तके मिळतात. मात्र, त्याच्या शेजारी बसणाऱ्या विद्यार्थ्याला पुस्तके मिळत नाहीत, हा विरोधाभास आहे. ६० वर्षे सवलती दिल्या, तरी त्यांना वर येता येत नाही. हे आता थांबले पाहिजे आणि आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे.''
खासदार रामदास आठवले यांची फिरकी ताईंनी घेतली. ते बायकांना मारामारी करायला सांगत आहेत. माझ्या अंगावर बायका सोडाल, त्या वेळी माझ्याही पाठीशी कोणीतरी असतील हे लक्षात ठेवा, असा इशारा देऊन ताई म्हणाल्या, ""रामदाससारखी व्यक्ती खासदार आहे. त्यांना समजत असेल असे मला वाटत होते. चर्चेसाठी अभ्यास करून येण्यास मी सांगितले होते. मात्र ते मुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन आले.''
"आता मागे फिरणे नाही'
राष्ट्रवादी कॉंग्रेसने मला नोटीस दिली आहे. उत्तर द्यायला अवधी आहे. मी उत्तर पाठविणार आहे. मी फक्त पक्षाने दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेचा आग्रह धरला आहे. या आधी मी विधिमंडळात आणि पक्षापुढे हा प्रश्न मांडला होता. आता तो जनतेपुढे मांडला आहे. माझ्या भूमिकेवर मी ठाम असून, आता पाठीमागचे दोर मी कापले आहेत. आता मागे फिरणे नाही, असे शालिनीताई म्हणाल्या.