उदाहरणासाठी जिथे सागरा हे गाणे दिले होते,अशासाठी  की एखादे वैज्ञानिक सत्य जेव्हा कवी वेगळ्या अलंकारिक भाषेत मांडतो तेव्हा त्या मर्यादित शब्दात त्याचे पूर्ण आकलन होईलच असे नाही. याच कारणासाठी शालेय अभ्यासात रसग्रहण / संदर्भासहित स्पष्टीकरण असे प्रश्न असायचे. या प्रश्नाचा उद्देश हा की विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कल्पनाशक्तीला ताण देऊन विस्तार करावा. पुढे गाईड  आल्यावर साचेबंद उत्तरे दिसू लागली हा भाग वेगळा.
विज्ञान हे अनेकांना रूक्षच वाटते. भूगोल तर त्याहून. त्यामुळे मी काढलेला अर्थ आपल्याला रूक्ष वाटणे शक्य आहे.
आता अजून एक उदाहरण देतो. कवीने इथे विज्ञानाने शोधलेल्या संकल्पनांचा उपयोग करून घेतला आहे आणि माणसाने भूगोलाच्या सोयीसाठी शोधलेली गोष्ट देवाच्या नावावर लावण्याचा प्रयत्न केला आहे.
हे गीत आहे धागा धागा अखंड विणूया. यात अक्षांश / रेखांशाचा उल्लेख आहे. पृथ्वीवर निसर्गत: अक्षांश-रेखांश आखलेले नसतात. ते माणसाने कल्पिले आहेत. तेही पाश्चात्यांनी , आमचा यात काहीही सहभाग नाही. तरी या गाण्यातील ओळ पहा.
अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे
विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणीले पांडुरंगे.
 

        

 

पण छान शब्दरचना, यमक अलंकार यामुळे अशा रचना आपल्याला खटकत नाहीत. हे उदाहरण देण्याचे कारण हेच की जर एखादा प्रतिथयश, प्रतिभाशाली कवी (इथे बहुधा पी. सावळाराम) अक्षांश रेखांशा सारख्या भूगोलातील `रूक्ष' गोष्टींचा उपयोग भक्तीगीतात करत असेल तर माझ्या सारख्या एखाद्या सामान्याने एखाद्या कवितेमधील ओळींचा वेगळा अर्थ काढला तर काय बिघडले? तुम्हाला नाही पटत तर सोडून द्या.
हा विषय आता खूप जुना झाला आहे. पण अधेमधे यावर प्रतिक्रिया येणार. ज्यांना काही नवीन सांगायचंय त्यांनी सांगावं. पण केवळ हिणवण्यासाठी प्रतिक्रिया नसावी ही विनंती.

आपला

रूक्ष भूगोल प्रेमी मंदार.