"काय, लग्न कधी करतोस? सेटल कधी होतोस?" अशा वेळी मी फ़क्त विचारणार्याचा क्रमांक मोजतो. प्रत्येक वेळी स्कोअर गेलाबाजार ५० नक्कीच होतो. ः-)
लग्न हीच आयुष्याची एकमेव गरज आहे का?
एवढ्यावर थांबत नाही. एकदा लग्न केले, की मग मुले कधी होणार, म्हणून मागे लागतात. बरं, लग्नानंतर एकदोन वर्षांत मूल झाले नाही, तर "लेका, काय करतोयस काय?" अशा समवयस्कांकडून निर्लज्ज पृच्छा, तर वडीलधाऱ्यांकडून आणखीही खाजगी / घाणेरड्या प्रकारचे प्रश्न / दबाव! ("काय फॅमिली प्लॅनिंग वगैरे करताय की काय? नाही ना? मग वैद्यकीय तपासणी करून घ्याच बरं एकदा!" आणि हे तथाकथित सुशिक्षित समाजातसुद्धा होते - किंबहुना सुशिक्षित समाजातच जास्त होत असल्यास आश्चर्य वाटणार नाही.) एकंदरीतच गलिच्छ प्रकार आहे सगळा.
'मुले होणे' हाच लग्नाचा एकमेव उद्देश आहे का? आणि समजा एखाद्याला लग्नानंतर दोनऐवजी तीन वर्षांनी मूल झाले, तर त्याचा अर्थ नवऱ्याचे पौरुषत्व किंवा बायकोचे स्त्रीत्व कमी पडते, असाच होतो का / होत असल्यास का व्हावा? का लग्न हे आपल्या लेखी केवळ 'हिंदू प्रजोत्पादनाचे एक(मेव) साधन' आहे? असे 'ब्रीडिंग' गायीम्हशींचे होते, पण माणसांचेसुद्धा? आणि तेही आपल्याच मुलासुनेचे? म्हणजे नवरा आणि बायको यांना गायीम्हशींहून अधिक किंमत नाही?
असो. 'स्कोअर'वरून आठवले. माझा एक मित्र या 'लग्न करून कधी सेटल होतोयस'च्या प्रश्नाला असाच वैतागत असे. अशा पृच्छा अर्थातच लग्न झालेल्या (आणि सहसा मुलेबाळे असलेल्या) मित्रांकडून येत. त्याचे म्हणणे, "च्याXX, मी या लोकांना विचारायला जातो का, की तुमचे पुढचे मूल कधी येणार म्हणून? मग मलाच हे लोक कोणत्या अधिकाराने विचारतात?" आता या प्रश्नाला देण्यासारखे योग्य उत्तर आजतागायत निदान माझ्याकडे तरी नाही.
- टग्या.