दाहक वास्तवाचे परिणामकारक चित्रण आहे हे. मैथिली, चित्रण खूप चांगलं झालंय पण हे वाचून मन इतकं सुन्न झालंय की याला छान म्हणताना जीभ कचरते.
या विषयाबद्दलची माझी काही निरीक्षणे अशी
१. साधारण अमेरिकेत कायमचे / काही काळापुरते / जाऊन येऊन वास्तव्य करणारे लोक बरेचदा स्वतःला इतर एतद्देशीयांपेक्षा जास्त थोर समजतात आणि भारत म्हणजे क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति अशी त्यांची समजूत असते. हे केवळ ढोबळ विधान आहे. पण त्यामुळेच लग्नाच्या बाजारात आपला अमेरिकेतला मुलगा म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे अशीही काही लोकांची समजूत असते. असे लोक एखाद्या उपवर मुलीची पत्रिका स्वीकारतानाही त्या वधूपित्यावर मोठे डोंगरभर उपकार केल्यासारखे वागतात असे निरीक्षण आहे. त्यामुळे या सत्य घटनेतल्या पाल्कांबद्दल राग आला पण आश्चर्य नाही वाटले.
२. आपला मुलगा म्हणजे सद्गुणांची खाण आणि येणारी सून वाईट असा दृष्टीकोन सार्वत्रिक दिसतो जो माझ्या मते अयोग्य आहे.मग मुलगा - सून घरात रहात असोत किंवा परदेशात.पण या कथेतील परिस्थिती पाहून खूपच वाईट वाटले.
३̮अहानपणापासून भारतीय मुलींना मिळणारी स्वार्थत्यागाची शिकवण ,कामसूपणाची सवय आणि एकूणच नवऱ्यापुढे दुय्यम स्थान स्वीकारण्याची त्यांना घालून दिलेली शिकवण यामुळे आयुष्यभर अमेरिकेतच राहू इच्छिणारे देशी साहेब इथल्या मुलींशी लग्न करतात. त्यांना डिपेन्डन्ट व्हिसावर अमेरिकेत राहण्यास तयार होणारी गृहकृत्यदक्ष सोफिस्टिकेटेड मोलकरीण हवी असते असे काहीसे जहाल मत माझे अलिकडे होऊ पहाते आहे हे स्त्रीवादीपणाच्या संभाव्य आरोपांना ध्यानात घेऊनही इथे सांगावेसे वाटते.
४. अश्या वेळी मुलींनी खंबीर राहून चाणाक्षपणाने वागायला हवे याची जाणीव त्यांना लग्न करून परदेशी पाठवण्यापूर्वी करून द्यायला हवी. नवऱ्यावर भोळेपणाने विश्वास न टाकता या कथेतल्या मुलीने सावधपणाने पावले उचलायला हवी होती पण परक्या मुलुखात अज्ञानामुळे तिला ते जमले नसावे. अमेरिकेतील भारतीयांचे हिंदी चित्रपटांतून दिसणारे खोटे प्रदर्शन बाजूला ठेवून त्या मुखवट्यामागे असू शकणारा चेहरा असाच समाजापुढे यायला हवा
५. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाचे लग्न करून दिले की अंगावर जबाबदारी पडेल आणि तो सुधारेल असल्या संकल्पनांमुळे एखाद्या गरीब बिचाऱ्या मुलीचा बळी देण्याइतक्या आजच्या मुली स्वस्त नाहीत हे सर्वच पालकांनी लक्षात घ्यायला हवे. या कथेतल्या मुलाच्या आई- वडिलांनी जर अशीच दुर्दैवी परिस्थिती त्यांच्या मुलीवर ओढवली असती तर काय झाले असते हा विचार करायला हवा होता.
व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यामधे एक पोकळ अशी अस्पष्ट रेषा असते. भारतीय मूल्ये आणि अमेरिकन जीवनशैली यांचा संगम घडताना या रेषेचे तारतम्य बाळगायला जर आपण देशी-परदेशी भारतीय शिकलो तर अशा घटना टळू शकतील.  सोन्याच दिन लवकरच येवो ही सदिच्छा..
--अदिती