३̮अहानपणापासून भारतीय मुलींना मिळणारी स्वार्थत्यागाची शिकवण ,कामसूपणाची सवय आणि एकूणच नवऱ्यापुढे दुय्यम स्थान स्वीकारण्याची त्यांना घालून दिलेली शिकवण यामुळे आयुष्यभर अमेरिकेतच राहू इच्छिणारे देशी साहेब इथल्या मुलींशी लग्न करतात. त्यांना डिपेन्डन्ट व्हिसावर अमेरिकेत राहण्यास तयार होणारी गृहकृत्यदक्ष सोफिस्टिकेटेड मोलकरीण हवी असते असे काहीसे जहाल मत माझे अलिकडे होऊ पहाते आहे हे स्त्रीवादीपणाच्या संभाव्य आरोपांना ध्यानात घेऊनही इथे सांगावेसे वाटते.
ऑब्जेक्शन, युअर ऑनर!
अशा गोष्टी घडतात, हे दुर्दैवाने खरे असले, तरी हा अपवाद आहे, नियम नाही. सर्वच अनिवासी भारतीयांना एकाच ब्रशाने रंगवण्याचा हा प्रयत्न अयोग्य, अन्याय्य आणि अपमानकारक आहे, आणि त्याबद्दल मी माझा तीव्र आक्षेप नोंदवू इच्छितो.
आणि लग्न करून अमेरिकेत येणाऱ्या सगळ्याच मुली अमेरिकेच्या ओढीने / लालचीने येतात हेही खरे नाही. काही थोड्या केसेसमध्ये हे होत असेल हे नाकारता येणार नाही, पण असे सरसकट विधान करणे हे अमेरिकेत लग्न करून आलेल्या बहुतांश भारतीय मुलींना - आणि त्यांच्या नवऱ्यांना - अपमानकारक आहे.
बाकी अत्यल्प परिचयानंतर अल्पावधीत विवाह (दुसऱ्या एका प्रतिसादातला 'एकदा पाहून आठवड्यात लग्न करण्याच्या भारतीय पद्धती'चा उल्लेख) वगैरेंबद्दल म्हणाल, तर हे अल्पकाळाची सुट्टी वगैरे 'प्रॅक्टिकल' कारणांमुळे अपरिहार्य होते. अल्पकाळात माहिती काढता येत नाही हे खरेच, पण हे उभयपक्षी लागू आहे. आणि अशा माहितीअभावे मुलींची जशी फसवणूक होऊ शकते (किंवा होते), तितक्या प्रमाणात होत नसली, तरी (अनिवासी भारतीय) मुलांची (रहिवासी भारतीय मुलींकडून) फसवणूक होऊच शकत नाही किंवा होतच नाही, हेही तितकेसे खरे नाही. अशाही केसेस अधूनमधून घडतात, आणि कान उघडे असल्यास ऐकूही येतात.
डिपेंडंट व्हिसाबद्दल म्हणाल, तर अमेरिकन व्हिसापद्धतीत अमेरिकेत राहत आणि नोकरी करत असणाऱ्या पण अमेरिकेचा नागरिक किंवा स्थायी रहिवासी (ग्रीनकार्ड होल्डर) नसलेल्या व्यक्तीच्या वैवाहिक जोडीदारास (spouseला समर्पक मराठी प्रतिशब्द नसल्याने हा शब्दप्रयोग) अमेरिकेस येण्यासाठी डिपेंडंट व्हिसाव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. (स्वतः नोकरीसाठी अथवा शिक्षणासाठी स्वतंत्र व्हिसावर आल्यास गोष्ट वेगळी, पण केवळ लग्न करून वैवाहिक जोडीदार म्हणून आल्यास हा एकच पर्याय आहे.) आणि डिपेंडंट व्हिसावर अर्थार्जन करणे हे अवैध आहे; पकडले गेल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. (डिपेंडंट व्हिसावर एकेकाळी शिक्षण घेता येत असे [अर्थात स्थानिक कायम रहिवासी नसल्यामुळे स्थानिक रहिवाशांपेक्षा अधिक फी देऊन], अजूनही घेता येत असावे असे वाटते, पण मध्यंतरी कायदे बदलले असल्यास कल्पना नाही. बाकी पकडले जाण्याचे प्रमाण/शक्यता किती, वगैरे पूर्णपणे वेगळा प्रश्न आहे, आणि काढणारे त्यातूनही [अवैध] पळवाटा काढतात, पण सगळेच - किंबहुना बहुतांश - तसे नसतात.) त्यामुळे 'डिपेंडंट' जोडीदाराने नोकरी करावी, अशी दोघांचीही इच्छा असली, तरी कायद्यावर आपले नियंत्रण नसल्याने काहीही करता येत नाही. अर्थात ग्रीनकार्ड मिळाल्यावर हा प्रश्न सुटतो (खरे तर ग्रीनकार्ड प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात एक वर्षाचे तात्पुरते वर्कपर्मिट विशिष्ट फी देऊन मिळू शकते, जे ग्रीनकार्ड मिळेपर्यंत दर वर्षी नव्याने मिळवावे लागते), पण शेवटी ग्रीनकार्ड प्रक्रिया ही एक bureaucratic process असल्याने त्यास किती वेळ लागेल, याची कोणी शाश्वती द्यावी! (अर्ज केल्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत यायला सरासरी तीन वर्षे आणि त्यानंतर प्रत्यक्षात मिळेपर्यंत सरासरी दोन वर्षे मानावयास हरकत नसावी.) त्यामुळे उभयपक्षी इच्छा असली तरी नोकरी न करणे/डिपेंडंट व्हिसावर राहणे भाग पडते.
अर्थात अशा डिपेंडंट जोडीदारास स्वतंत्र व्हिसा स्पॉन्सर करणारा कोणी एम्प्लॉयर (मराठी?) भेटला, तर प्रश्न मिटला, पण प्रत्यक्षात असे होण्यापेक्षा तोंडाने म्हणणे सोपे आहे.
तरी बरे, डिपेंडंट व्हिसावर जोडीदाराबरोबर लगेच अमेरिकेत येणे तरी शक्य असते. याउलट अनिवासी भारतीय जोडीदाराचे लग्नाअगोदरच ग्रीनकार्ड झालेले असेल, तर मग ही डिपेंडंट व्हिसाची तरतूदसुद्धा उपलब्ध नाही. अशा वेळी अशा अनिवासी भारतीयाने आपल्या जोडीदारासाठी ग्रीनकार्डसाठी अर्ज करणे, आणि ग्रीनकार्ड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतातील जोडीदाराने अमेरिकेस न येणे (कारण ग्रीनकार्ड प्रक्रिया चालू आहे म्हणून किंवा सुरू केली नसली तरी ग्रीनकार्डधारक जोडीदार आहे तस्मात् 'इंटेंडिंग इमिग्रंट' म्हणून दुसरा कोणताही स्वतंत्र व्हिसासुद्धा मिळणे अशक्य!) हा एकच मार्ग राहतो. म्हणजे भारतातील जोडीदाराची ग्रीनकार्डप्रक्रिया पुरी होईपर्यंत (गेला बाजार चार ते पाच वर्षे) नवराबायकोंनी एकमेकांचे तोंड पहायचे नाही! यातून (वैध) पळवाट एकच: (शक्य असेल तर) भारतातील जोडीदाराने लग्नाअगोदर स्वतंत्रपणे वर्क व्हिसा किंवा स्टुडंट व्हिसावर अमेरिकेस येणे, आणि अमेरिकेस आल्यावर दोघांनी लग्न करणे. अर्थात हे सर्वच परिस्थितीत शक्य नसते.
थोडक्यात, डिपेंडंट व्हिसा हा नाइलाजाचा भाग आहे. आणि याचा अर्थ जर अनिवासी भारतीयांना बायका म्हणून सॉफिस्टिकेटेड मोलकरणी हव्या असतात असा घेतला जात असेल, तर ती दुर्दैवाची आणि अन्याय्य बाब आहे.
(उलटपक्षी भारतीय मुलीने वर्कव्हिसावर अमेरिकेत येऊन नवऱ्याला डिपेंडंट व्हिसावर आणल्यानंतर, 'नवरा नुसता घरी बसून राहण्यापेक्षा समोरच्या भारतीय उपाहारगृहात [अवैधरीत्या] वेटर म्हणून त्याने काम केल्यास चार पैसे तरी मिळतील' असेही प्रकार घडल्याचे पाहण्यात आहे. अर्थात यातील अवैधरीत्या काम करण्याचा भाग सोडल्यास यात निश्चितपणे गैर असे काहीच नाही; विशेषतः संसाराला हातभार लावण्यासाठी [इतर कामांच्या अभावी] वेटर म्हणून काम करून पैसे मिळवण्यात तर काहीच वाईट नाही, आणि हा निर्णय नवऱ्याचा [स्वेच्छेने घेतलेला] होता की बायकोचा [लादलेला] याबद्दल निश्चित/अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अवैधरीत्या काम करण्याव्यतिरिक्त याला काही आक्षेप असण्याचे कारण नाही; केवळ असेही घडू शकते, हे दाखवण्याचा - आणि तेही केवळ 'सॉफिस्टिकेटेड मोलकरणी'च्या आरोपाचे खंडन करण्याच्या उद्देशाने - मानस आहे.)
(तसाही 'सॉफिस्टिकेटेड मोलकरणी'च्या आरोपाला मी व्यक्तिशः अपमानकारक म्हणून आक्षेप नोंदवू इच्छितो. स्वतः माझी पत्नी नोकरी करते [तीही मुळात डिपेंडंट व्हिसावरच इथे आली], माझ्या मित्रांच्या बायकांपैकी अनेकजणी नोकरी करतात, आणि ज्या करत नाहीत, त्यांनी घरी बसून घर सांभाळण्याचा निर्णय स्वखुशीने घेतलेला आहे. त्यांच्याकडे बघण्याचा कोणाचाही दृष्टिकोन 'सॉफिस्टिकेटेड मोलकरणी'चा आहे असे मला तरी जाणवले नाही.
फार काय, भारतातही अनेक स्त्रिया नोकरी न करता घर सांभाळतात. त्यांच्याकडेही कोणी 'सॉफिस्टिकेटेड/अनसॉफिस्टिकेटेड मोलकरीण' म्हणून बघितल्याचे ऐकिवात नाही.)
अर्थात अनिवासी भारतीयांनी लग्नच करू नये, किंवा केलेच तर ते अभारतीय मुलींशी किंवा अमेरिकेत अगोदरच स्वतंत्रपणे आलेल्या भारतीय मुलींशी करावे, असे जर आपले म्हणणे असेल, तर गोष्ट वेगळी. याला माझे चार आक्षेप आहेत.
१. अनिवासी भारतीयांनी लग्न करू नये हे ठरवण्याचा या कोर्टास कोणताही अधिकार नाही.
२. अभारतीय मुलीशी लग्न करणे यात वस्तुतः गैर (किंवा अशक्यही) काही नसले, तरी ते प्रत्येकाला जमेल/आवडेल/पटेल (हे अमेरिकेत सर्वत्र आढळणारे गुजराती आडनाव नव्हे.)/'वेव्हलेंथ', आवडीनिवडी, विचारसरणी जुळेल, असे निश्चितपणे सांगता येणार नाही.
३. अमेरिकेत नोकरीसाठी स्वतंत्रपणे येणाऱ्या भारतीय मुलींत अविवाहित, अगोदरच लग्न न ठरलेल्या मुलींचे प्रमाण नगण्य असते, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. विद्यार्थिवर्गात त्यामानाने प्रमाण अर्थातच अधिक असते, परंतु अशी एकंदर लोकसंख्या विचारात घेता, मामला एकंदरीत कठीणच होतो. (तसेही विद्यार्थी म्हणून येणाऱ्यांत पुढील आयुष्याबद्दलच्या कल्पना/अपेक्षा काहीशा पुसटच असतात, हा अनुभव आहे. [यात त्यांचा दोष नाही.] त्यामुळे विद्यार्थिदशेत 'सेम बोट'मधील दोघांनी विवाह केल्यास गोष्ट वेगळी - पुढे काय याची दोघांनाही कल्पना नसल्यामुळे 'आगे जो कुछ भी हो, देखा जाएगा, एकमेकांना सांभाळून घेऊ' ही समज असू शकते, पण दोघांपैकी एकजण जवळजवळ 'सेटल' झाल्यात जमा (आणि म्हणूनच पुढील आयुष्याबद्दल काही अंशी तरी - म्हणजे साधारणतः वासरांतल्या लंगड्या गायीसारखी - निश्चित कल्पना / अपेक्षा असणारा), आणि दुसरी विद्यार्थी अशा अवस्थेत एकमेकांचे निश्चित विचार / अपेक्षा कळणे इथेच मुळात घोडे अडू शकते. त्यामुळे हाही पर्याय सर्वथा शक्य आहेच, असे म्हणता येणार नाही.
४. तसेही एखाद्या अनिवासी भारतीयाने एखाद्या रहिवासी भारतीय मुलीशी लग्न करणे यात अनैतिक, अवैध, आक्षेपार्ह किंवा गर्हणीय असे काहीही नाही. त्यामुळे याला आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. (शेवटी हा ज्याचात्याचा प्रश्न आहे, वगैरे वगैरे...)
व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यामधे एक पोकळ अशी अस्पष्ट रेषा असते. भारतीय मूल्ये आणि अमेरिकन जीवनशैली यांचा संगम घडताना या रेषेचे तारतम्य बाळगायला जर आपण देशी-परदेशी भारतीय शिकलो तर
एक तर मूल्ये ही मूल्ये असतात. त्यात भारतीय मूल्य - अमेरिकन मूल्य असे काहीही नसते. पाळणारे पाळतात, न पाळणारे पाळत नाहीत - मग ते भारतात असो किंवा अमेरिकेत. 'माणसाने माणसाला फसवू नये' हे जागतिक मूल्य असावे.
आणि 'अमेरिका म्हणजे स्वैराचार, सहज सोपे आयुष्य' अशी जर आपली (गोड?) समजूत असेल, तर 'कुठल्या गाढवाने सांगितले आपल्याला?' असे विचारण्याचा मोह केवळ मनोगती कोर्टाच्या सभ्यतेच्या अपेक्षेपोटी आवरता घेतो.
'मेकिंग ऑफ़ ऍन अमेरिकन इमिग्रंट' नावाची एखादी लेखमालिका लिहिण्याइतकी माझी प्रतिभा प्रगल्भ नाही (तितका माझ्यात पेशन्सही नाही), पण इथे येऊन स्थिरस्थावर होणे (किंवा इथे राहणेही) सोपे (किंवा सर्व मजा) नाही, एवढेच नमूद करू इच्छितो.
बाकी स्वैराचाराबद्दल म्हणाल, तर स्वैराचाराचे प्रकार मुंबईत नि पुण्यात घडत नाहीत, अशी जर आपली धारणा असेल, तर 'कुठल्या जमान्यात राहता आपण?' असा माझा आपल्याला एक अत्यंत नम्र (आणि प्रामाणिक) प्रश्न आहे.
थोडक्यात, भारतात बसून अनिवासी भारतीयांबद्दल (त्यांच्या बाजूचा विचार न करता) वाटेल तसे ताशेरे झाडणे सोपे आहे, पण 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' म्हणतात, तेच खरे.
आय रेस्ट माय केस, युअर ऑनर!
- टग्या.
अवांतर: सदर कथेच्या मुख्य पात्राविषयी ('नायिका' हा शब्द या संदर्भात वापरणे जिवावर येते, म्हणून 'मुख्य पात्र' हा शब्दप्रयोग.) किंवा तत्सम 'व्हिक्टिम्स'(मराठी?) विषयी सहानुभूती जरूर आहे, आणि अशा गोष्टी घडतात ही निश्चितच दुर्दैवाची आणि शरमेची गोष्ट आहे, पण अशा गोष्टींची (विशेषतः अशा सार्वजनिक, इंटरऍक्टिव्ह फ़ोरम्सवर*) प्रसिद्धी आणि त्यानंतर घडणारी त्यावरची चर्चा यांतून एक चर्वितचर्वण यापलीकडे काहीही साध्य होत नाही, जे सदर 'व्हिक्टिम'ला इच्छित/अपेक्षित/आवडण्यासारखे/न्याय्य असेलच, असे नाही, असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते. सदर व्यक्तीला मराठी कळत नाही हे तिचे नशीबच म्हणायचे! अधिक विचार करता, त्या व्यक्तीच्या जागी मी जर असतो, तर माझी धारणा 'Leave me alone to get along with my life, damn it - Help me if you can, but please don't discuss my woes publicly!' (इंग्रजीबद्दल [आणि अपशब्दांबद्दल] क्षमस्व!) अशीच राहिली असती, याची खात्री वाटते.
* इंटरऍक्टिव्ह फ़ोरमसाठी कृपया चांगला मराठी प्रतिशब्द सुचवावा. बाकी 'फ़ोरम'चे अनेकवचन म्हणून 'फ़ोरा'ऐवजी 'फ़ोरम्स' हा अमेरिकन पर्याय आजकाल बहुधा सर्वमान्य असावा.