मैथिली,
सुनिताची कहाणी वाचली आणि मन विषण्ण झाले. अशाच माहितीतल्या २-३ सुनिता आठवल्या. त्यातल्या लंडानच्या एका सुनिताला तर यातून सुटकेचा मार्ग किंवा संधी मिळू शकली नाही. ती भारतात परतण्याच्या तयारीतच होती पण अचानक(!) आदल्याच दिवशी सहाव्या मजल्यावरच्या आपल्या घराच्या खिडकीच्या काचा पुसत असताना वरून पडून तिचा दुर्दैवी अंत झाला. तिची वाट पहाणाऱ्या मुंबईतल्या तिच्या आई-वडिलांना केवळ ही बातमी कळवण्यात आली. तिचे अंत्यदर्शनही झाले नाही.
तुमच्या कथेचे तीनही भाग एकदमच वाचले, आणि उशीरा वाचायला मिळल्याने त्या अनुषंगाने झालेली चर्चाही सलगपणे वाचली.
चर्चेत काही ठिकाणी असा सूर दिसला की सुनिताचाही यात तितकाच(?) दोष आहे, शिवाय अशा प्रसंगी सहानुभूती स्त्रियांनाच मिळते.
मला वाटते सुनिताच्या बाबतीत तरी असा विचार करणे अन्यायाचे होईल. तिची अगदी योजनाबद्ध फसवणूक केली आहे. शेवटी सुखात कोण आहे आणि फसगत कुणाची झाली यावरच सहानुभूती कुणाला मिळेल हे ठरणार. टग्या म्हणतात तशी काही उलट उदाहरणेही मिळतात. परदेशी जाण्यापुरते ग्रीनकार्डधारक मुलाशी लग्न करून नंतर तिकडे त्याला सोडून दिल्याचे एक उदाहरण हल्लीच ऐकले. अशा उदाहरणात केवळ स्त्री म्हणून तिला सहानुभूती मिळणार नाही. किंवा वा! छान. मुलीही आता चांगला धडा शिकवू लागल्या या परदेशी मुलांना असा सूडउगव्या कौतुकाचा सूरही कुणी लावणार नाही.  म्हणूनच सुनिताला मूर्ख ठरवून 'प्रवीण काय असे समाजात बहुसंख्येने आहेत तुम्हीच अज्ञानी किंवा मूर्ख!' अशी प्रतिक्रिया घातक वाटते. प्रवीणच्या फसवणूक करण्याच्या या विशेष प्राविण्याला आपण सामाजिक मान्यता देतो आहोत असे वाटते. अज्ञानी किंवा मूर्ख असणे, भोळसट असणे हे वैयक्तिकदृष्ट्या नुकसानकारक असू शकते पण ते समाजविघातक नाही जितके फसवणूक करणे घातक असू शकते. म्हणून चूक कोणाची याचा कीस न पाडता प्रवीणचा किंवा प्रवीणप्रवृत्तीचा थेट निषेधच व्हायला हवा.  
परदेशी जायचे तर स्वबळावर जावे असाही एक मुद्दा वाचनात आला. केवळ सुनिता परदेशी गेली म्हणून तिची अशी फसगत झाली असे वाटत नाही. अशी फसगत व्हायला परदेशच कशाला हवा? इथेही घडतात अशा घटना. देश वेगळा हवा असे नाही गाव, राज्य वेगळे असले तरी पुरते. कधी- कधी ते एकच असते आणि माहेरच्यांना पत्ता नसतो आपली मुलगी सासरी कशी आहे त्याचा! इथल्या सुनितांना नातेवाईक-मित्रमैत्रिणींचा आधार  मिळू शकेल इतकेच! पण समाजाला तोंड देणे आलेच!
परदेशात पटले नाही तर मुले सोडून देतात हे तिकडे अगदी सर्रास आहे. त्यामुळे तिकडे राहायचे तर तिकडच्या समाजाप्रमाणे रहावे  अशा अर्थाचाही सल्ला एका प्रतिसादात दिसला. मग प्रवीणने इकडे येऊन, आई-वडिल जीव देतील म्हणून त्यांच्या शब्दाखातर सुनिताशी लग्न करण्याचा निर्णय घेताना भारतीय समाजाप्रमाणे का विचार केला? भारतात येऊन, भारतीय मुलगी पाहून, पसंत करून तिला तिकडे नेईपर्यंत भारतीय समाजाची विचारसरणी चालते, तिकडे गेले कि लगेच तिकडचा समाज आणि विचारसरणी! चपला काढून बूट घालण्या इतक्या सोप्या गोष्टी आहेत का या?   

सुनिताच्या कथेने सुन्न केले!