चक्रपाणि ह्या संस्कृत शब्दाचे मराठीत चक्रपाणी व्हायला हवे हे पटत नाही.

तसा मराठी शुद्धलेखनाचा नियम असल्याने पटत नसले तरी तसे लिहायला हवे. विशेषनामांच्या बाबतीत असा आग्रह धरणे योग्य नाही पण इतर वेळी मराठीत 'चक्रपाणी' असेच लिहायला हवे.  मी शाळेत असताना रवि, कीर्ति, नीति हे शुद्धलेखनाच्या नियमाला धरून होते. तसेच अनेक अनुच्चारित अनुस्वारही  मराठीत होते. जसे कांहीं, नांव. पण मधल्या काळात ते नियम बदलले. सर्व अनुच्चारित अनुस्वार गाळून टाकले गेले. शब्दात इ/ई, उ/ऊ शेवटी येणारे शब्द  ईकारान्त/ऊकारान्त लिहावेत असाही बदल झाला. (अपवाद परंतु, इत्यादि, आणि ह्या शब्दांचा).

मला स्वतःला रविमधून रवीमध्ये येताना हाताला (आणि मनाला पण) त्रास झाला पण नियमच तसा झाल्याने ते अंगवळणी पाडून घेतले.

तुम्ही म्हटले आहे की पाणि ऐवजी पाणी लिहिल्याने अर्थामध्ये फरक पडेल. पण एकाच शब्दाचे -जिथे ऱ्हस्वदीर्घाचाही फरक नाही-एकाहून जास्त अर्थ मराठीत होतात. उदा. घाट - नदीचा घाट, भांड्याचा घाट, आज मोठाच घाट घातला आहे.,  घाटणे क्रियापदाचा आज्ञार्थ इत्यादि. अशा ठिकाणी आपण संदर्भाने अर्थ लावतो.

(शुद्धलेखनाच्या नियमांबद्दल मनोगतावरच कुठेतरी माहिती आहे. शोधण्याचा कंटाळा आला आहे. कारण आता माझ्या संगणकाकडून प्रतिसाद यायला फार वेळ लागतोय. जमल्यास उद्या दुवा देईन. )    

-मीरा