नमस्कार,

 अशा वेळेस आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजेत अशा धीराच्या गोष्टीः

  1. अतिरेक्यांना धर्म नसतो... इस्लाम हा एक शांतताप्रिय धर्म आहे. बघा ना म्हणूनच शबाना याचा निषेध करावयाच्या ऐवजी शांत आहे...शेवटी काय, "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.." आपण आपले प्रेम अशा अतिरेकी वृत्तीमध्ये वाटू आणि चुटकी सरशी हा प्रश्न मिटवू!
  2. आपण जर नावाने का होईना पण हिंदू असलात, तर बहुसंख्य आहात याची जाणीव ठेवून उगाच अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावू नका.  गरज पडली तर बाळासाहेबांवर टिका करू शकता - दंगलींसाठी नाही तरी निदान पुलंना नावे ठेवल्याबद्दल चर्चा घडवून आणू शकता. त्यानिमित्ताने जरा सकारात्मक विषयांतर घडेल.  सामान्य माणसाच्या आयुष्यापेक्षा ते अधिक महत्वाचे आहे. विशेषतः जेंव्हा पुल आणि सुनिताबाई त्यांबद्दल बोलले नसल्यामुळे...
  3. जे झाले त्यात राजकारण्यांची काही चूक नाही - आबा पाटील झाले काय, विलासराव झाले काय किंवा शिवराज पाटील झाले काय सर्वजण अथक कामे करत आहेत. मनमोहनसिंग सारखे ज्ञानी पंतप्रधान असताना आणि सोनियाजींसारखी राष्ट्र्माता असताना काही काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय चूक झालीच तर अडवाणींसारखे थोर आहेतच त्यांना सरळ करायला. गरज पडली तर समाजवाद्यांचे कम्युनिस्ट मित्र, कम्युनिस्टांचे चीनमध्ये मित्र आहेत आणि प्रसार माध्यमांचे काय साक्षात मुशारफ़च मित्र आहेत.

आता आपण काळजी कशी घ्यावी?

  1. मुंबईत राहत नसलातर काही प्रश्न नाही वांझोटी काळजी इतरांसाठी करावी आणि मुंबई सर्वांची कशी आहे हे सांगावे..
  2. पदवीधर आणि चांगल्या जागी काम करत असलात तर राजकारण्यांचा आणि राजकारणाचा विचार फक्त गप्पा मारण्यासाठीच करा.  ते काही आपले क्षेत्र नाही - काय करणार, जे जे होईल ते ते पाहणे आणि स्वतःच्या कमाईची काळजी घेणे सर्वात सोयिस्कर..
  3. भारतात राहत असलात तर जरा लांब जागा घ्या आणि स्वतःची गाडी ठेवा म्हणजे अशा गर्दीतल्या अतिरेक्यांना तोंड द्यायला नको.
  4. अमेरिकेत असलात तर ग्रिनकार्ड घेण्याच्या मागे लागा.. ते घेऊन पाच वर्षे झाली असली तर नागरिकत्व घ्या म्हणजे काही प्रश्न नाही! नागरिकत्व घेतले म्हणून आपला चर्चा करायचा हक्क शाबूत राहतो तेंव्हा काळजी नसावी.. शिवाय आपल्याला इथे व्यवस्था (system) तयार करायच्या फंदात पडावे लागत नाही ती इथली लोक करतातच.  आपण फक्त कीबोर्ड मान वर न करता बडवला की झाले - सर्वकाही सुरक्षित...

शेवटी (तुम्हाला कळले असलच) हा उपरोधिकपणा सोडून एक गोष्ट सांगतो

डॅनियल आणि फिलिप बेरीगन या दोन भावंडांनी, जे चर्चमधे पुजारी होते त्यांनी अमेरिकन सरकारविरोधात व्हिएटनामवरून चळवळीला न्यू यॉर्क मध्ये १९६० च्या दशकात सुरुवात केली.  त्यांना अटक करून नेत असताना कोणीतरी त्यांना विचारले की " It's fine for you to go to prison, Father Berrigan. After all, you have no children. What's going to happen to our children if we go to prison?" डॅनियल यावर उत्तरले, "what's going to happen to them if you don't?"

आज आपण पण जर बोलतानापण नेभळटच राहणार असलोतर आपली पुढची पिढी कशी होईल? मराठा आणि त्याचा राष्ट्र्गाडा सर्वच पंक्चर...