चैतन्यराव,
कविता भावुक आहे, कल्पना छान आहेत. प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीचे 'रात्र अंधारी अंधारी' कवितेला एक गेयता प्रदान करते आहे. मात्र शेवटचे कडवे वगळता इतर कडव्यांमध्ये मला या गेयतेत थोडी बाधा ज़ाणवते आहे. पुढीलप्रमाणे काही बदल केल्यास कवितेस अष्टाक्षरीचे रूप येऊ शकते. तसेच गेयतेच्या दृष्टीने अधिक सफ़ाई येईल असे मला वाटते -
रात्र अंधारी अंधारी
एक(किंवा 'तरी') दिवा नाही दारी.. (किंवा 'दिवा नाही माझ्या दारी')
झगमगे प्रकाशात
तुझी आठवण ऊरी..
रात्र अंधारी अंधारी
युगापरी (किंवा युगासम) क्षण भासे (किंवा 'क्षण भासे युगापरी' जास्त चांगले वाटेल का?)
आभाळही दाटलेले,
डोळी आणि मनातही (डोळ्यांत तसेच मनात दोन्हीकडे आभाळ दाटले आहे, या अर्थी)
रात्र अंधारी अंधारी
नभी चंद्र ना चांदणी..
आक्रंदते मन तरी
राही कोरडी पापणी..
रात्र अंधारी अंधारी
लावी फासांवर फास..
चालणारे माझे श्वास,
जणू भासावर भास..
रात्र अंधारी अंधारी
कधी होणार पहाट..
शुष्क डोळ्यांनी पाहतो
तुझ्या परतीची वाट..
या सुचवण्या पूर्ण वैयक्तिक स्वरूपाच्या असून त्या स्वीकारल्याच ज़ाव्यात असा आग्रह बिलकुल नाही. मी कोणी कविता तज्ज्ञ किंवा ज़ाणकार नाही. तेव्हा या सुचवण्या मी कुठल्या तरी अधिकारवाणीने सुचवतोय असा गैरसमज़ कृपया होऊ देऊ नका.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.