मुस्लिम समाजाकडे बोट दाखविले जाणे अगदी स्वाभाविकच आहे. तसेच ह्या अमानुष घटनेमागे मुस्लिम दहशतवादच आहे याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. धर्मांध शक्तींचा कठोरपणे बीमोड करायलाच हवा आणि अपराध्यांना गोळ्याच घालायला हव्यात हे वेगळे सांगायला नकोच.

हे तथ्य अमोल यांनी मांडलेल्या सकारात्मक भूमिकेने नाकारले आहे असे बिलकुल नाही. तरीही त्यांनी सुचविलेला उपाय हाच एकमेव मार्ग बहुसंख्य समाजासाठी उपलब्ध आहे.

मुस्लिम समाजातील कोणी जर सहकार्यास समोर येत असेल तर ते इतरही समाजासमोर येणे गरजेचे आहे. खाली दिलेले आणि सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त 'अजूनही असेही घडत आहे' हा दिलासा देणारे आहे. अनुकरणीय म्हणून मुस्लिम समाजाला आणि जखम निवळण्यासाठी हिंदू समाजाला अशी उदाहरणे हवी आहेत.

सकाळमधील बातमी ही अशी -

बॉम्बस्फोटातील जखमींसाठी मुंब्य्रात उत्स्फूर्त रक्तदान

ठाणे, ता. २२ - मुंबईत बॉम्बस्फोट झाले की मुंब्य्रावर नेहमीच संशयाचे धुके निर्माण होते. आज मात्र मुंब्य्राचा रंग न्यारा होता. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या आपल्या "भावंडां'च्या मदतीसाठी येथील मुस्लिम "कौम' आज धावून आली. मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज रक्तदान केलेल्या १०० जणांपैकी ६२ जण मुस्लिम होते. "हम भी कुछ कम नही' म्हणत तब्बल २५ मुस्लिम महिलांनी रक्तदान करून देशप्रेमाची अनोखी साक्ष दिली. ......
मुस्लिम समाजाचे वर्चस्व असलेल्या मुंब्रा शहरावर नेहमीच मुंबईतील देशविघातक कारवायांनंतर संशयाची सुई रोखली जाते. अतिरेकी कारवाया करणारे मुंब्य्रात आश्रयाला असतात हा आरोपही होतो. दोन वर्षांपूर्वी सापडलेले "तैयबा'चे अतिरेकी आणि गुजरात पोलिसांच्या चकमकीत मारली गेलेली मुंब्य्रातील इसरत या तरुणीमुळे मुंब्य्राचे नाव बदनाम झाले आहे. मूठभर गद्दारांमुळे साऱ्या कौमची बदनामी होत असल्याने वेदना होतात, अशी व्यथा येथील सच्चा देशप्रेमी मुसलमान मांडतो. या बदनामीमुळे आमच्या मुलांना कुणी नोकऱ्या देत नाही, क्रेडिट कार्ड मिळत नाही, बॅंका कर्ज देत नाहीत, त्यामुळे प्रचंड त्रास सोसावा लागतो, असे गाऱ्हाणे येथील मुस्लिम आणि हिंदू तरुणही मांडतात.

अस्लम कुरेशीदेखील मुंब्य्रातील मुस्लिमांवर होत असलेल्या टीकेबद्दल विचारले असता बोलू लागतात, देशभरात सर्वच ठिकाणी दंगे उसळतात; मात्र नेहमीच टीकेचा धनी ठरलेल्या मुंब्य्रात आजवर एकही दंगल उसळलेली नाही. मुंब्य्रात ७५ टक्के लोकसंख्या मुस्लिमांची असली तरी येथून निवडून गेलेल्या १३ नगरसेवकांपैकी ९ जण हिंदू आहेत. २६ जुलैचे आस्मानी संकट असो किंवा सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे मुंब्रा रस्त्यावर होणारे अपघात असोत, येथील हिंदू आणि मुसलमानांनी खांद्याला खांदा लावून त्याचा सामना केला आहे. काही जणांनी अतिरेक्‍यांना आश्रय दिला म्हणून साऱ्या कौमला बदनाम करणे अयोग्य असल्याचे येथील डॉ. मरियम नाझ सांगतात. मुंब्य्रात गुन्हेगार लपले असतील, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्यामुळे साऱ्या मुंब्य्राला मिनी पाकिस्तान म्हणून हिणवले जाऊ नये, असे दीपक शिंग्रे यांनी सांगितले. मुस्लिमांच्या अल मदिना वेल्फेअर असोसिएशन, जमाते मुस्लिम, अमन कमिटी यांसारख्या संघटना नेहमीच मुंब्य्रातील शांततेसाठी झटत असतात, तसेच आम्हीदेखील श्रावण महिन्यात गहू, तांदूळ, साखर धान्य वाटताना कधीही हिंदू मुस्लिम भेदभाव करीत नाही, असेही शिंग्रे यांनी सांगितले.

काल मुबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर जखमींना रक्ताची गरज असल्याचे समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी तातडीने येथे रक्तदान शिबिर भरविले. मुंब्य्राचे स्टेशन मास्तर हरुण शेख यांनी कोणतीही आडकाठी न करता मुंब्रा स्थानकात त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. या शिबिराला आज अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. चेहरा दाखविण्यासही मज्जाव असलेल्या मुस्लिम महिला बुरख्यात रक्तदानासाठी उतरल्या. अनेकांच्या भुवया उंचावल्या; तर मुस्लिम पुरुषांचा ऊर अभिमानाने फुलला. येथील प्रत्येक जण काल झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत चिंता व्यक्त करीत होता आणि या देशविघातक कृत्यात आभाळ कोसळलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी काय करता येईल यासाठी तळमळीने बोलत होता. संवेदनशील मुंब्य्रातील जनतेच्या संवेदना धार्मिक भेदभावात न अडकता अजूनही जिवंतच असल्याचे हे प्रतीक होते.