शुभदा जोशी यांस

काही वेळा मुलांच्या वागण्यामुळे आपल्याला त्रास होतो म्हणून राग येतो. जेव्हा आपण असे म्हणतो तेव्हा आपल्याला राग येण्याचे कारण आपण मुलांच्या वागण्यांत पाहतो. 'अहं ब्रह्मास्मि'प्रमाणे आपणच आपल्या अनुभवांचे निर्माते असतो म्हणजे आपण आपल्याला त्रास करून घेतो किंवा राग आणतो. एक सहजासहजी न पटणारे मानसशास्त्रीय सत्य म्हणजे कोणत्या परिस्थितीला काय भावनिक प्रतिक्रिया असावी हे निसर्गतः ठरलेले नसते तर ते बहुतांशी आपण कौटुंबिक परंपरेतून अनुकरणाने शिकलेले असते. (त्याचमुळे भिन्न परंपरेतून आलेल्यांना आपल्या भावनिक प्रतिक्रिया समजत नाहीत). त्यांत स्वेच्छेने विवेकबुद्धि वापरून बदल करता येतात. पण बहुतेकजण त्या भानगडीत पडत नाहीत.

एखाद्या परिस्थितींत राग येत असेल तर त्याचे निदान करून व विवेकबुद्धीचा वापर करून योग्य ती कृति करणे श्रेयस्कर आहे. ते सोडून रामनामांत दंग होणे म्हणजे "पेन किलर" (दुखरेपणा जाणवू नये म्हणून घेतले जाणारे औषध) घेण्यासारखे आहे. त्याने दुःख जाणवत नाही पण मूळ अनारोग्य नाहीसे होत नाही व प्रतिकारशक्तीही निर्माण होत नाही. उलट पेन किलर च्या झटपट वरपांगी उपचाराची संवय लागण्याची व त्यामुळे प्रतिकारशक्ति उत्तरोत्तर अधिकाधिक क्षीण होत जाण्याची शक्यता असते.  

बाकी सर्व वाचकांच्या विवेकबुद्धीवर सोपवतो.