मंडळी, मुंबईकरांना शूर म्हणा वा म्हणू नका - माझं काही म्हणणं नाही. पण वरच्या दोन निरोपांमधे सैनिकांच्या लढाऊ प्रेरणेबाबत जे काही बोललं गेलेलं आढळलं त्यावरून कुसुमाग्रजांची एक नितांतसुंदर कविता आठवली. फ़ारसं विषयांतर होणार नाही म्हणून इथे देतो आहे. योगायोगाने तिच्यात रेल्वेही आहे.
मी काही नेहमीच्या बैठकीतला आणि इथल्या बऱ्याच जणांसारखा व्यासंगीही नाही.  पण मुंबईच्या सांप्रतच्या अवस्थेला एक जबरी फ़िट शब्द आज वाचायला मिळाला तो सांगतो. तो आहे SOCIAL COMA.

सैनिक
कुसुमाग्रज

सैनिक म्हणजे नाटकातला समरधुरंधर आम्हा दिसतो,
लीलेने भवपाश तोडुनी जो गनिमांच्या फ़ळीत घुसतो.
पीळ मिशीला भरून म्हणतो "या या सारे". "माय कुणाई व्याली ..." वगैरे 
उडवुनी अटणी शतशत्रूंची - पिटाकडे पाहून जरासा गाली हासतो.
आणि रेल्वेमध्ये जेव्हा विटकी खाकी पेहरणारे,
तुटक्या द्रोणातील वड्यांचे दही पिणारे,
अभंग अथवा दोहे ओवी गुणगुणणारे - असे शिपाई सहज भेटती,
देत जांभया त्रस्त स्वराने आम्हां म्हणती,
"बरी नोकरी कारकुनाची, पगार घ्यावा मेजावरती,
दिवस रजेचे किती तयाला नाही गणती,
हा फ़ौजेचा कठीण पेशा - शिस्तीचे वरवंटे माथा सदैव फ़िरती.
- मुलांमाणसांमधून लागे दूर जावया"
आणिक हे म्हणताना डोळे किंचित भिजती.
वीररूप हे असले पाहुन पांढरपेशा श्रद्धा अमुच्या - थिएटरातील बनावटीच्या
विचलित होती.
व्यथित होऊनी परस्परांना आम्ही पुसतो, "काय शिपाई असेच असती?"
... होय, शिपाई असेच असती!

परंतु आम्हा उमगत नाही ते हे -
नाटकातल्या त्या शूराला नसते तेथे मरावयाचे,
असते केवळ टाळीसाठी वीरत्वाने स्फ़ुरावयाचे,
पायदिवे विझल्यावर आणिक घरी जाउनी दुलईमध्ये शिरावयाचे.
रेल्वेतला सैनिक पण हा -
करांत त्याच्या दहीवड्यांचा द्रोण असू द्या, स्वरात त्याच्या तक्रारीचा भाव दिसू द्या,
मुले माणसे म्हणता त्याचे नेत्र भिजू द्या,
जेव्हा अपुली [टिनोपालची] मुलकी दुनिया सोडुनी जातो,
रणगाडे - तोफ़ा - तंबूंच्या रणात अपुली जागा घेतो,
गळून पडती सर्व जांभया, तक्रारींचा सूरही विरतो,
दूरस्थांतील आप्तजनांचा आठव तेथे विद्ध न करतो.
मळकट कवचे रेल्वेतली गळून पडती,
आणि सनातन पुरुषार्थाचा सोलिव गाभा युद्धतळावर उभा राहतो.

रेल्वेतला हाच शिपाई
अग्नीचे घनलोळ भोवती बरसत असता गोळे भरतो.
खंदकातल्या भाईसाठी घास आपुला दूर सारतो.
शरीर पिंजून गेले तरिही हात उभारुन अशरण वरती
या भूमीवर कोसळणारे गगनाचे छत रोख़ुनी धरतो,
- रोखुनी धरतो!