विडंबन आणि आज ऐकिवात असलेले रिमिक्स यात महत्त्वाचा फरक हा की कशीही असली तरी विडंबन ही स्वतंत्र रचना असते,त्याला मग कवीने स्वतःच्या कुवतीनुसार विनोदाच्या अंगाने फुलवण्याचा प्रयत्न केलेला असतो,त्यामुळे मूळ काव्याचा विपर्यास होण्याची शक्यता नसते,फार तर विडंबन जमले नाही असा शेरा वाचणारे मारतील.याउलट रिमिक्स मध्ये मूळ गाणे चालीसह जसेच्यातसे ठेवून आणि त्यातील संगीताचा बाज बिघडवून वेगळ्या पद्धतीने गाऊन त्या गाण्याचे विकृतीकरण केलेले असते.त्यामुळे मूळ गीत ऐकले नसेल तर त्याविषयी चुकीची भावना निर्माण होऊ शकते तसे विडंबनाने होत नाही.