अतिंद्रीय शक्ती, असमर्थनीय चमत्कार, मानवी मर्यादांच्या पलीकडील गोष्टी... हे सगळे इतरांच्या बाबतीतच का होत असते? 'मला स्वतःला हा अनुभव आला आहे' असे सांगण्यापेक्षा अमक्याला असा साक्षात्कार झाला, तमक्याला असा दृष्टांत झाला असेच का सांगितले जाते?
प्लँचेटने मृत व्यक्तींच्या आत्म्याशी संपर्क साधणारी वाटी आमच्यासारख्या नास्तीकांचे बोट लागले की तीळभरदेखील हलत नाही, हे कसे?
भानामती, करणी, अंगावर बिब्ब्याच्या फुल्या उमटणे, कपडे आपोआप पेट घेणे हे प्रकार घरातल्या लोकांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रश्न सुटले की आपोआप थांबतात, हे कसे?
नागपंचमीला बत्तीसशिराळ्यालाही लोकांना नाग चावतो, आणि वैद्यकीय उपचार केले नाहीत तर ते लोक दगावतात, हे कसे काय?
शंभर नवजात अर्भकांच्या कुंडल्या मांडून त्यांचे भविष्य सांगणे आणि त्याचा पडताळा करून पहाणे ही फलज्योतिषाची साधी चाचणी करून बघायला आजपर्यंत एकाही ज्योतिषविशारदांने तयारी दाखवली नाही, हे का?
कोणत्याही यज्ञाने (मग त्यात अग्नीहोत्र आणि पर्जन्ययज्ञही आले) अमुक एक गोष्ट साध्य होते हे निर्विवादपणे सिद्ध करून दाखवणारी एकही चाचणी कुणी देऊ शकत नाही, हे कसे काय?
किरलियन फोटोग्राफी या तंत्रात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सजीव वस्तूला स्वतःचे असे तेजोवलय असते आणि त्याचे चित्रण करता येते ( योगी पुरुषांच्या मागे दिसते ते हेच तेजोवलय!), तर मग एखाद्या निर्जीव पदार्थातून उच्च विद्युतदाब सोडून त्याचे चित्रण केले तरी असेच तेजोवलय दिसते, हे कसे काय?
येशूचे प्रेतवस्त्र, पैगंबराचा पवित्र केस, ज्ञानेश्वरांच्या समाधीचे अंतरंग यांची (समाधीला कोणताही धक्का न लावता करता येण्यासारखी) तपासणी, याला इतका विरोध का?
व्रतवैकल्य, कुळाचार, हरितालिका, ऋषीपंचमी, गौरीगणपती, नवरात्र, मंगळागौरी, एकादशी, चतुर्थी अशी भरभक्कम दैवी संपत्ती बाळगणाऱ्या देशातल्या अर्ध्याहून अधिक महिला कोणत्या ना कोणत्या दृष्टीने कुपोषित, आणि दरवर्षी कित्येक लाख महिला आणि अर्भके बाळंतपणातच मृत्युमुखी हा कोणत्या देवाचा न्याय?
तुकारामापासून ज्योतिराव फुल्यांपर्यंत आणि विवेकानंदांपासून 'अनिस' च्या साध्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांनी इतकी वर्षे कानीकपाळी ओरडून सांगूनही 'मनोगत' सारख्या भासमान माध्यमावरही अशा आपल्याला मागे नेणाऱ्या अशा विषयांवरच्या चर्चेत 'असेल बुवा काहीतरी...' अशी ठिसूळ आणि विवेकहीन भूमिकाच मुख्यत्वे दिसते, हे का?