उपरोक्त प्रकार कोणत्या व्यवसाय क्षेत्रात नाहीत ते सांगा. याचा अर्थ असा नाही की मी त्यांचे समर्थन करतो, पण केवळ त्याकडे लक्ष देऊन सैन्य प्रवेशाची संधी नाकारू नका. आता वर उल्लेखलेले अपघातग्रस्त मेजरचे उदाहरण घ्या. त्यामध्ये "मेजर" ऐवजी कोणत्याही कारखान्यातल्या एका कामगाराची कल्पना करा. परिस्थिती मध्ये काय फरक पडेल? म्हणून काय कारखान्यातही नोकरी करायची नाही? तीच गोष्ट बढाईखोर व उर्मट सैनिकांची, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असायच्याच. मलासुद्धा काही उर्मट अधिकारी भेटले तसेच काही मनमिळाऊ, मदतीला तत्पर अधिकारीही भेटले. माझ्या पहिल्या प्रयत्नात मला एका निवृत्त विंग कमांडरनी कसलीही अपेक्षा न ठेवता खूप मदत केली. रात्री १०-११ वाजेपर्यंत मी त्यांच्या घरी थांबत होतो. CDAC ला असताना माझा जवळ जवळ ४० सैन्य अधिकाऱ्यांशी संपर्क आला. त्यांची त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांबद्दलची भाषा मलातरी "सभ्य" वाटली नाही. पण तो त्यांच्या व्यवसायाचा एक अविभाज्य परिणाम आहे. सीमेवर काम करताना पुढच्या एका सेकंदाचाही भरवसा देता येत नाही. असाच ऐकलेला एक प्रसंग. माझ्या एका मैत्रिणीचा भाऊ सैन्यात आहे. तो सीमेवर तैनात असताना आपल्या तंबूत उभा होता. फक्त कॉफीचा कप उचलण्यासाठी म्हणून तो खाली वाकला आणि त्याच्या मागचा आरसा गोळी लागून फुटला! अशा परिस्थितीमध्ये "कोमल" मन टिकूच शकत नाही. हीच भावनाशून्यता रोजच्या व्यवहारातही उतरते. "काम करून हाताला पडलेले घट्टे" आणि "सतत मृत्यूच्या छायेत वावरून झालेले भावनाशून्य मन" यात माझ्या दृष्टीने तरी काहीही फरक नाही.