प्रियालीताई, आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय सुरू केला आहे. कौन्तेयरावांच्या प्रतिसादात व्यक्त झालेले विचार बव्हंशी पटले.
देशाच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांविषयी बहुतेक सामान्य नागरिकांना आदर आणि आपुलकी असते. पण आपल्या जिवलगांना सैन्यात न पाठवण्यामागे "शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा" अशी भावना कारणीभूत आहे असे वाटते. या औदासिन्यामुळे सैन्यात बऱ्याच जागा रिकाम्या राहतात. परिणामी सेवेत असलेल्या लोकांना रजा मिळणे अवघड होते. यासाठी सरकारने सैन्यभरती वाढवण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. शिवाय सैन्यदलातील लोकांना आपल्या घरच्यांची काळजी करावी लागू नये इतपत पगार आणि सोयीसुविधा देणे आवश्यक आहे. आपणही आपल्याला शक्य असल्यास स्वतः भरती होणे किंवा ज्यांना भरती व्हायचे आहे त्यांना प्रोत्साहन आणि सहकार्य करणे हे करू शकतो.
काही देशात प्रत्येकाला काही वर्षे (१ किंवा २) सैन्यदलात काम करणे आवश्यक असते, काही ठिकाणी ऐच्छिक असते. भारतात यापैकी ऐच्छिक उपक्रम सुरू व्हावा असे वाटते. सध्या सैन्यदलाशी जवळून ओळख करून घेण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचजणांना त्यात सहभागी होण्याची इच्छाही होत नाही. अश्या उपक्रमामुळे ती संधी अनेकांना मिळेल असे वाटते.