शशांक,
या मुद्द्याला स्पर्श केल्याबद्दल आभारी आहे.
व्यवसायाच्या निमित्ताने मी मागची जवळपास ५ वर्षे द.कोरियामधे होतो. गेल्या सहा महिन्यांपासून चीनमधे आहे. आपल्याला माहित असेल की विश्वविद्यालयीन शिक्षणानंतर सर्व पुरूषांना कोरियामधे २८ महिन्यांचं सैनिकी शिक्षण / सेवा सक्तीची आहे. आजकाल ८०% विद्यार्थी विश्वविद्यालयीन शिक्षण घेतातच. तशी सेवा एखाद्याकडे नसेल तर निवडणूक लढवण्यापासून इतरही बऱ्याच नागरी सुविधांवर पाणी सोडावं लागतं. कोरियामधे असताना माझे सर्वच सहकारी ही सेवा पार पाडून आलेले होते. एकंदरच कोरियन शिक्षणपद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे साधी पदवी घेईपर्यन्त त्यांचं वय बरंच झालेलं असतं [किमान २५-२७]. त्यानंतर पुढे हा प्रकार. यामुळे सैनिकी सेवेनंतर थोडकं व्यवसायाला लागल्यावर तिशीच्या आगेमागे लग्न [करायचं ठरवलं तर] नि तेहेत्तिशीच्या आगेमागे मुलं होणं [होऊ द्यायची ठरवलीच तर] हे सध्याच्या काळातलं तिथलं वर्तमान आहे. यामुळे माझ्या हापिसात माझे सर्व कनिष्ठ सहकारी माझ्याहून वयाने मोठे होते. या सर्वांकडून सैनिकी अनुभवाबाबत मिळणारे सामायिक मत म्हणजे 'नको रे बाबा'. कारणं बरीच आहेत. शेवटी सक्ती ही सक्ती आहे. तिथे होणारी शारीरिक / मानसिक छळवणूक मर्दानगीच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी नजरेआड करणे, तारुण्याच्या बहरात आवडीच्या गोष्टी करायला न मिळणे इ.इ.
या व्यवस्थेचा मला जाणवलेला एक मोठा दोष म्हणजे ज्या वयात स्वतःची मतं बनवायची, वेगवेगळ्या विचारसरणींत स्वतःला भरकटू द्यायचं त्या वयात हे झापडबंद टोणगे बनवले जातात. आणि मग केवळ सरकारी यंत्रणेकडून कळलेली माहितीच खरी मानायची ही सवय बनते. जगात कोण कशावर काय बोलतोय - काय सुरू आहे याची कुणाला काही पडलेलीच नसते.
दुसरं म्हणजे वरिष्ठांचा मान राखण्याचा अतिरेक. व्यावसायिक जीवनातही हे सुटत नाही. बॉसला दारू प्यायची असेल तर सगळ्या कक्षाने रात्री सोबत जायलाच हवं. तिथे बसून हसा खेळायलाच हवं. किती वाजता निघूया हे विचारायचं नाही इ.इ. एका सहकाऱ्याच्या बायकोचा मोबाइल फ़ोन कोणता असावा याबाबत साहेबाने सक्ती केलेली मी पाहिलेली आहे.
ही कुचंबणा खाजगीत सगळेच मान्य करतात, पण यातून बाहेर पडता येत नाही.
तरीही आता चीनमधे आल्यावर आणि भारतातली स्थिती आठवता त्रिवार वाटत रहातं की अशी काहीतरी व्यवस्था असणं आवश्यकच आहे. कोरियन समाजासारखा शिस्त आणि सौजन्य यांचा मिलाफ़ आपल्यासाठी तर अत्यावश्यक आहे. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना पगार द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत - भर मुंबईत कुपोषणाने तान्हुली मरताहेत त्यामुळे भारताला सक्तीचं सैनिकी शिक्षण ही चैन परवडणारी नाही.
पण समाजात जबाबदार नागरिक म्हणून प्रवेश करण्यापूर्वी एक सामायिक शिस्त बाणवणारी यंत्रणा आवश्यक आहे. आजची शिक्षणव्यवस्था आणि राजा-राणी-राजकुमार कुटुंबव्यवस्थाही हे करायला दिवसेंदिवस अधिकाधिक कुचकामी ठरत आहेत.
समाजात एक मिळवता घटक म्हणून प्रवेश करताना - समाजाकडून काही घेण्याची अपेक्षा करण्याआधी समाजाला काही देणं लागतो याची जाणीव होणासाठी तरी आपल्याकडे सामाजिक / निमशासकीय / सैनिकीय सेवांची सक्ती विद्यार्थ्यांवर केली जावी या मताचा मी आहे. लोकसंख्या नको तितकी उदंड आहे, पण साक्षरता, आरोग्य, माहिती प्रसार, रुग्णसेवा अशा कितीतरी कितीतरी आघाड्यांवर कामं करायला माणसंच नाहीत.

प्रियाली, विषयांतर झालं का? तुम्ही फ़ार करड्या नजरेच्या चर्चाप्रवर्तक आहात म्हणून ही भीती. हाटोना[हा टोमणा नाही].