भरपूर पैसा कमावणे ही महत्वाकांक्षा असणे हे मराठी माणसाला कमीपणाचे वाटते असे माझ्या पहाण्यात आले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला तुला काय करायचे आहे किंवा तू या अभ्यासक्रमाला प्रवेश का घेतलास असे विचारले असता बहुसंख्य मराठी विद्यार्थी ज्ञान मिळवणे, श्रमातला आनंद अशी पुस्तकी उत्तरेच देतात. खूप पैसा मिळवण्यात काही चुकीचे आहे आणि तसे करणे अपराधीपणाचे मानले पाहिजे अशी काहीशी मानसिकता दिसते. 'धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती' हे सुभाषित ठरावे असे काहीसे संस्कार मराठी मनावर झाले आहेत. (अर्थात ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे, हेही खरे)
दुसरे म्हणजे भरपूर पैसा मिळवायचा म्हणजे तो गैरमार्गानेच मिळवला पाहिजे हा गैरसमज. 'मी उत्तम, दर्जेदार काम करीन, उत्तम उत्पादने तयार करीन, उत्तम सेवा पुरवीन आणि त्याबदल्यात खणखणात पैसा वाजवून घेईन' अशा मानसिकतेऐवजी 'मी कामचुकारपणा करीन आणि तुटपुंज्या आमदनीत राहून अल्पसंतुष्टपणाचे महत्व सांगत पैशावर सुख कसे अवलंबून असत नाही असे म्हणून पैसा मिळवणाऱ्यांवर मनातून जळत राहीन' हीच मराठी मनाची मानसिकता आहे. अंग मोडून काम आणि भरपूर पैसा याऐवजी ऐदीपणा आणि भिकारडेपणा यातच मराठी माणूस धन्यता मानतो हे दुर्दैवी सत्य आहे.
आम्ही काय करायला हवे? पैसा मिळवणे, सांभाळ्णे, वाढवणे कसे जमेल? आमची पुढची पिढी कोट्याधीश आणि त्यापुढची अब्जाधीश होईल का?
चिंतनाला प्रवृत्त करणारा विषय. गोरा यांना धन्यवाद.