प्रयाण....

कवितेचे नाव खूप काही सुचविते.  प्रयाण हे पूर्ण कविता वाचून महाप्रयाण आहे हे हळू हळू लक्षात येते.  घुबड, चितेतल्या ठिणग्या, कर्कश भासणारी टिटवी, होरपळ आणि पालखी त्या प्रयाणाची पूर्ण कल्पना देतात.  हे संकेत शेवटच्या आभासाचे आहेत असे वाटते.

आताच तर इथे वसंतोत्सव सुरु झालाय,
हे फ़ुलांचे बहर डोळ्यात मावत नाहीयेत....
मग हे घुबडाचे करुण कण्हणं
कुठून असं ऐकू येतंय........?

पहिल्या दोन ओळी खरी वास्तविकता दाखवतात आणि पुढच्या दोन ओळी मनात काय वाततेय ते दाखवतात.  जगाला फुलांचे बहर आहेत पण तरीही घुबडाचे कण्हणे ऐकू येणे म्हणजे प्रयाणाची चाहूल लागणे तर नाही?  घुबड आधीही कण्हत असेल पण आज ते इतके स्पष्ट लक्ष जाऊन का ऐकू येतेय असा काहिसा ओळींचा मला अर्थ मिळाला.

दूजेचा हा चंद्र दूर
किरणांची सतार छेडीत आहे शांततेच्या सीमेवर,
मग चितेतल्या उडणाऱ्या ठिणग्यांचा तडतड आवाज
कुठुन बरं ऐकू येतोय............?

तोच अनुभव इथे दृधावतो.

क्षितिजावरचा सूर्य बघ प्रेमभरे अलविदा करतोय
आपल्या पूर्वप्रियेला,
मग ही टिट्वी इतकी आरपार
कर्कशतेय का बरे...................?

पुनर्प्रत्यय.

ही तुळशीवृंदावनाची पणती
इतकी सुंदर संथ तेवतेय,
मग वणवा पेटल्यागत अंतःकरणाची
होऱपळ का होतेय रे......................?

सगले मंगल पण मनात पाल चुकचुकतेय असे वाटते.

ही मंदिरातली आरती किती छान अंगाई गातेय,
पण ही पालखी अनोळखी मलाच उचलून
कुठे निघालीय आत्ता बघ..............?

महाप्रयाण.