नमस्कार,
पश्चिम बंगाल मधील नक्षलबारी येथे चारु मुजुमदार या कम्युनिस्ट व्यक्तीने सुरू केलेली सशस्त्र मार्गाचा अवलंब करणारी संघटना ही भारतातील कम्युनिस्टांशी संबंध सांगणारी पहिली सशस्त्र चळवळ. ही सुरवातीच्या काळात बंगाल मधील जमीनदारांविरुद्ध - भूमिहीन लोकांची चळवळ होती.
सुरवातीच्या काळात या संघटनांना व्यापक जनाधार प्राप्त झाला. त्याला कारण म्हणजे त्यांची कार्यपद्धती व त्यांचे कार्यक्षेत्र!
त्यांची कार्यपद्धती होती, ताबडतोब निर्णय आणि ताबडतोब अंमलबजावणी!
त्यांचे कार्यक्षेत्र होते. भारतातील अतिदुर्गम, मागास व आदिवासी क्षेत्रे. जेथे आदिम व्यवस्था स्वातंत्र्यानंतरही टिकून होती. तेथील स्थानिक रहिवास्यांकडे सरकारचे लक्ष नव्हते आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या घोषणेसहित नक्षलवाद्यांचा या क्षेत्रांत शिरकाव झाला. आणि वर सांगितल्याप्रमाणे सुरवातीच्या काळात त्यांना व्यापक जनाधार प्राप्त झाला होता.
पण इतर चळवळींचं झालं तसंच या चळवळीचं सुद्धा! पहिली समर्पित कार्यकर्त्यांची पिढी संपल्यानंतर आलेल्या प्रमुखांनी ही चळवळ जनसामान्यांची न ठेवता ती म्हणजे आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला. त्यातून मग जो दुराचार सुरू झाला तो आज या स्तराला पोहोचला आहे की हे नक्षलवादी नव्हे तर आतंकवादी आहेत असे वाटायला लागले आहेत.
नक्षलवादी म्हणजे ज्यांना भारतातच राहायचं आहे. मात्र ही व्यवस्था बदलायची आहे. जनसामान्यांना , शोषितांना न्याय मिळेल अशी व्यवस्था(साम्यवादी) निर्माण करायची आहे. त्यांची देशातून फुटून निघण्याची मागणी मुळीच नाही. म्हणून त्यांच्या बद्दल आतंकवादी हा शब्द उपयोग केला जात नाही.
भारताच्या वर नेपाळपासून ते भारतात बिहार, झारखंड,ओरिसा, छत्तिसगढ, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, असा विशाल लाल पट्टा त्यांनी निर्माण केलेला आहे. या सर्व राज्यांत अतिशय घनदाट जंगली क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. यांची कार्यपद्धती अतिशय शिस्तबद्ध आहे. क्षेत्र- त्यांचे उपक्षेत्र आदी सगळी संरचना आहे. यांचे दलम असतात, ज्यांचा दलम कमांडर असतो/ असते. दोन विंग आहेत. सशत्र कारवाया करणारे आणि महसुलाची व्यवस्था पाहणारे.
आपल्या महाराष्ट्रात यांचा शिरकाव अतिपूर्वेकडील भागात म्हणजे गडचिरोली, गोंदिया,भंडारा आणि चंद्रपूर येथे आहे. गडचिरोलीतील तेंदूपत्ता तोडणाऱ्या आदिवासी कामगारांना सुरवातीला केवळ ५ रु प्रति दिवस मिळायचे , या नक्षली लोकांनी या विरोधात आंदोलन करून ती मजुरी ४० रु. करून घेतली आणि महाराष्ट्रात जे भक्कम पाय रोवले ते आज तागायत.
मात्र गेल्या काही वर्षापासून ही चळवळ भरकटत गेलीय. आता हे सुद्धा शोषक बनले आहेत. आता यांच्या दलम कमांडर व त्या वरील अधिकाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करताना गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळत आहे. आणि आता गेल्या काही दिवसांत तर केवळ रोटी मागणाऱ्या या लोकांनी जेव्हा पोटची बेटी मागण्याचा प्रकार सुरू केला तेंव्हा मात्र आदिवासी स्वतः या नक्षलवादी शोषणाच्या विरोधात उभे राहिले. या चळवळीचा वाढता जोर पाहून सरकार सुद्धा याला अनुकूल झाले आणि नक्षलवाद्यांच्या पाया खालची जमीन निसटू लागली.
या चळवळीचे नाव आहे, सालवा -जुडम ! म्हणजे - सगळे लोक एकत्र !
आणि हा दांतेवाडा जिल्ह्यातील हल्ला जो झाला ना ! तो अश्याच सालवा जुडम च्या शिबिरावर झाला आहे. ही चळवळ(सालवा जुडम) छत्तीसगड मध्ये आहे म्हणून हे हल्ले तिथे उद्या महाराष्ट्रात झाली तर येथे ही होतील.
एक बाब लक्षात येते आहे का? ज्या आदिवासींच्या जोरावर (जीवावर) ही चळवळ होती. तिच्यावरच हे लोक हल्ले करताहेत. म्हणजे आपला जनाधार स्वतःच गमावत आहेत. आता या क्षणी आपल्या सरकारने पूर्ण तयारीनिशी या चळवळीला पाठिंबा दिला पाहिजे. हि चळवळ संपवण्याची नामी संधी चालून आली आहे. सरकारने याचं सोनं करायला हवं .
देव सरकारला सदबुध्दी देवो.
नीलकांत.