चर्चा जास्त रंगतात, पेटतात, चविष्ट होतात या अर्थाने लोकप्रिय असे म्हटले असेल तर हरकत नाही. अन्यथा चर्चा हाच जास्त लोकप्रिय विषय आहे असे वाटत नाही. चर्चा दर्शनी पानावर येते असे असले तरी बहुमताचा/अंतर्मनाचा सुप्त कल चर्चेतर लिखाणालाच असावा असे मला वाटते.

चर्चेमध्ये व्यक्तिगत दोषारोप होऊ नयेत ही भूमिका मान्य. पण एखाद्याला दुसऱ्यास कधीतरी फटकारावेसे वाटले तर तेही चालायचेच. कोणी अतिरेकाने भूमिका मांडत असेल, ऐकतच नसेल तर असा जालीम उपाय योग्यच वाटतो.

स्वतःच्या मनातील राग काढण्यासाठी कोणी येथे येतो की नाही माहीत नाही. पण कोणी तसे करण्यासाठी येत असेल तर येऊ द्या की. आनंद पसरविणे, सुंदर कल्पना मांडणे हे उदात्त असले तरीही कधी त्रागा करून कोणाचे मन मोकळे झाले तर तोही मनोगताचा सदुपयोगच म्हणायचा.

एखाद्याला इतर कोठे मोठेपणा मिळत नसेल तर त्याने मनोगतावर तसा प्रयत्न करून मानसिक, बौद्धिक भूक भागविली तर बिघडले कोठे? जर केविलवाणी आणि त्रासदायक धडपडाट असेल तर सुज्ञ दुर्लक्ष करतीलच... अशी उदाहरणे काही कमी नाहीत.

सुनील जोशी -
आपल्या भावना आणि सदिच्छा समजल्या... आणि प्रत्येकाने अधुनमधुन स्वतःकडेच पाहिले पाहिजे हा भावही लक्षात आला. पण अगदी या भावनेतून विषय मांडतानाही व्यक्तिगत दोषारोप झालेच किंवा तसे झाले नसतील तरीही झाले झाले म्हणून टीका झालीच. (या दोन्हीतले एकतरी खरे!!) पण त्याने नक्कीच कोणाच्या आयुष्यात लगेच फरक पडत नाही, मनोगताचे स्वास्थ्यही बिघडत नाही, की आकाशपाताळ एक होत नाही.
अर्थात मनोगत मराठी जनांच्या आयुष्यात काही सुंदर क्षण आणते आहे... काही सकारात्मक घडविते आहे... अशी अनेकानेक उदाहरणे अगदी या आठवड्यातील विविध लेख/चर्चा/प्रतिसाद वाचले तरीही लक्षात येईल.

खुलासा - शुसू वापरलेला नाही, लिखाण परत वाचलेले नाही... काही गफलत राहून गेलेली असल्यास जरूर व्यक्तिगत आरोप करावेत...