आदरणीय चित्तरंजन सर,
कवितेच्या उत्तरीय चाचणीची विनंती मान्य केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. वास्तविक एका संवेदनशील (? ), ज़ाणकार आणि ज़बाबदार (?) कवीमनाकडून कोणतेही स्पष्टीकरण न देता ही चिथावणीखोर कविता रचना म्हणूनही टुकार आहे असे सरसकट विधान होणे तद्दन बेज़बाबदारपणाचे वाटते. प्रसंगी त्याची कीवही येते. पण अशा विधानामुळे ज़र विस्तृत चर्चा होणार असेल, तर 'हेही नसे थोडके'.
आता ज़रा विस्ताराने -
१. कवितेचा मूड सारखा स्विंग होताना दिसतो. कवितेत फोकस नाही.
मध्येच राजकीय विधाने करण्याचा मोह कवीला आवरत नाही.
--- पूर्ण कवितेचा मूळ विषय पहिल्या कडव्यापासून शेवटापर्यंत एकच आहे. आणि तो काय आहे, हे आपण सर्वच ज़ण ज़ाणतो. त्यामुळे फ़ोकस कशावर आहे, हे वेगळे स्पष्ट करायला नकोच. सबब, कवितेत फोकस नाही हे मुळीच पटले नाही, पटणार नाही. कवितेचा मूड एकच नाही, हे मी पूर्णपणे मान्य करतो. पण मूड स्विंग न होता असहायतेकडून चीड येण्याकडे आणि तिकडून एक आव्हान करण्याकडे स्थानांतरीत झाला आहे. तो ज़र तळ्यातमळ्यात होत राहिला असता तर त्याला स्विंग होतोय म्हणता आले असते.
एकतर राजकीय कविता, विडंबन लिहा नाहीतर मग पेटून उठवणारी कविता लिहा. मग ती तद्दन कम्युनल, चिथावणीखोर असली (आणि मला असले लिखाण आवडत नसले तरी)तरी हरकत नाही. कमीतकमी चिथावणीखोरपणाला दाद दिली असती.
पण ही कविता मध्येच कुठेतरी लटकली आहे.
--- मला कवितेतून काय सांगायचे आहे, आणि ही कविता कोणत्या मनस्थितीत, आज़ूबाज़ूच्या कोणत्या परिस्थितीत लिहिली गेली आहे, हे सगळी दुनिया ज़ाणते. कवितेतील राजकीय विधाने रूपकात्मक पद्धतीने कशी आणि कशासाठी योजली गेली आहेत, हे सुद्धा तुम्ही नीट ज़ाणता. अशा वेळी वरील विधानात तुम्ही केलेले कवितेचे वर्गीकरण करण्यामागे तुमच्या स्वतःच्या राजकीय विचारसरणीचा पगडा ज़ाणवतो; किमान तसा अंदाज़ बांधता येतो आहे. त्यामुळे वरील विधान 'जनरलाइज़्ड' म्हणून स्वीकारावेसे वाटत नाही.
२. 'विव्हळत भोवळणारी आर्तता' शब्दबंबाळ आहे. 'धुमसत्या चितांचे कर्ज' काढल्याने एकंदरच परिस्थिती अजूनच चिघळते. ही काही उदाहरणे.
--- कवितेतील काही ओळी शब्दबंबाळ आहेत; तुम्ही उल्लेखलेल्या तर नक्कीच आहेत. अगोड शब्दयोजना आहे. हे तुमचे मुद्दे विनावाद मान्य आहेत. चिघळणाऱ्या परिस्थितीबाबत नीट आकलन झालेले नाही. ते होणार नसेल तर मुद्दा गैरलागू ठरतो.
कवितेतील विषयामुळे आलेला भडकपणा, ओळींमधील शब्दबंबाळपणा हे सगळे सगळे मी कबूल करतो. पण शेवटी ते असहायपणाच्या आणि उद्विग्नतेच्या अतिरेकाचा परिपाक आहे, हे विसरून चालायचे नाही. ते कसे हे माझ्या खाली दिलेल्या स्वतंत्र प्रतिसादात स्पष्ट केले आहे. इच्छा असल्यास नक्की वाचा.
३. शब्दांची आणि अभिव्यक्तीची(एक्सप्रेशनची) निवड आवडली नाही. म्हणूनच कवीने केलेला 'विनयभंग' सोसवत नाही. त्याने 'पदर फेडलेली बापडी माय माझी' अतीच वाटते.
--- बरोबरच आहे हो तुमचे. मुळीच चूक नाही म्हणत मी. शब्द आणि अभिव्यक्तीची पद्धत तुम्हाला आवडली नाही, आणि म्हणूनच कविता टुकार वाटली, हाच मूळ मुद्दा आहे. आणि तसे असेल तर तो मी पूर्ण मान्य करतो. अर्थात वर आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे तो कसला परिणाम आहे, हे आता तुम्ही ज़ाणता. मी त्या शब्दबंबाळपणाचे, भडकपणाचे समर्थ करत नाही; करणारही नाही. पण त्याशिवाय स्वतःला पूर्णपणे आणि मोकळेपणे व्यक्त करायला माझ्याकडे कविता लिहिली तेव्हा सुदैवाने/दुर्दैवाने दुसरा मार्ग नव्हता, इतकेच सांगू शकतो. पटलेच पाहिज़े असा आग्रह नाही; पटेल अशी अपेक्षा नाही.
अर्थात, विनयभंग, पदर फेडलेली आई, हे सगळे सोसवण्यासाठी, बघण्यासाठी ११ जुलैला मुंबईत असायला हवे होतात; आणि आयुष्याच्या ज़डणघडणीची सगळी बहुमोल वर्षे मुंबईत काढायला हवी होतीत. तुमच्या सुदैवाने/दुर्दैवाने तुम्ही मुंबईत वाढला नसाल/नाही दीर्घकालीन वास्तव्यास नसाल/नाही. त्यामुळे विनयभंगाबद्दल आणि माझ्या आईच्या फेडलेल्या पदराबद्दल वरची विधाने तुमचे माझ्या आईबद्दलचे अज्ञान म्हणून सोडूनही देता येतील.
४. कविता पोरकट असली तरी वृत्तात आहे ही जमेची बाजू आहे.
--- मनःपूर्वक आभार. असल्या तद्दन टुकार कवितेत काहीतरी ज़मेची बाज़ू सापडली, हे माझे भाग्यच!
लांबलचक प्रतिसाद (त्या खास करून माझे) असले, की तुम्हाला तिटकारा येतो, हे यापूर्वी झालेल्या एका चर्चेचा प्रसंगी तुम्ही दाखवून दिलेच आहे. मी वर जे काही स्पष्ट केले आहे, त्याचीच संक्षिप्त आवृत्ती तुम्हांला खाली असलेल्या मिलिंद फणसे आणि प्रवासीपंतांच्या प्रतिसादात सापडेल, अशी आशा आहे.
कोणाविषयी व्यक्तिगत आकस वगैरे असण्याचा प्रश्न/हेतू नाही. तुमच्याविषयी असलेला आदर, मार्गदर्शन होण्याची इच्छा आणि जिज्ञासा यांमुळे तुमच्याशी इतके सविस्तर बोलता येते. माझी मते व्यवस्थित मांडता येतात. फक्त मनोगतावरील तुमच्यासारख्या ज़ाणकारांकडून, ज़बाबदार समज़ल्या जाणाऱ्यांकडून, संवेदनशील कवीजनांकडून स्पष्टीकरणाशिवायच सरसकट विधाने ठोकण्याची गल्लत होऊ नयेत, ही माफ़क अपेक्षा ठेवली, तर त्यात माझे काही चुकले आहे, असे मला मुळीच वाटत नाही.
याला तुम्ही माझा आडमुठेपणा/अडेलतट्टूपणा समज़त असाल,तर खरोखरच वाईट वाटते.
तुमचा (अडाणी+खिन्न) विद्यार्थी,
चक्रपाणि