समस्त वाचकहो,

प्रस्तुत कवितेतील काही मुद्दे तुम्हांला पटले, काही नाही पटले. सर्व मतमतांतरे, सूचना, चर्चा यांचे स्वागतच आहे. सर्वप्रथम एक स्पष्ट करतो, की या कवितेला सर्वांनी वावा, क्या बात है, सुंदर, अप्रतिम असेच म्हटले पाहिज़े किंवा प्रतिसाद दिलाच पाहिज़े, अशा कोणत्याही भावनेतून ही कविता लिहिली गेली नाही. प्राप्त परिस्थितीविषयीची चीड, शरीराने अमेरिकेत पण मनाने मुंबईत असल्यावर अशा घटनांमुळे वाटणारी असहायता, आणि एक प्रकारची समज़ून घेता येण्यासारखी उद्विग्नता यांचा 'मागणे' हा परिपाक आहे. मला काय वाटले, ते तुम्हांला सांगावे इतकाच हेतू आहे.

श्रेयस नवरे हा माझा एक चांगला मित्र. उत्तम, उदयोन्मुख व्यंगचित्रकार. ख्यातनाम व्यंगचित्रकार आरे के लक्ष्मण यांचा सहवास, स्नेह आणि मार्गदर्शन. राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित. अशा संवेदनशील कलाकाराची अभिव्यक्ती केवळ वर्तमानपत्रात जाहिरातींसाठी ज़ागा आहे, पण त्या अभिव्यक्तीसाठी नाही, या एकाच कारणामुळे नाकारली ज़ाते. आणि तेही त्याला हास्यास्पद वागणूक देऊन. या एकाच कारणामुळे आमच्यासारख्या अनेकांना तमाम जनतेकडे पोचता येत नाही. आणि आपले म्हणणे मांडता येत नाही. त्याच्याशी माझे बोलणे होते आणि या घटनेबद्दल कळते. इतकेच नाही, तर माटुंगा आणि वांद्रे स्थानकावरच्या दयनीयतेचे इकडे राहूनही दर्शन घडते. आमच्या मैत्रिणीने आपल्या प्रियजनाच्या प्रत्यक्ष मृत्यूचे दर्शन घेऊन ज़बरदस्त धक्का बसून काही काळासाठी पूर्ण मूक झालेल्या षोडषवर्षीय महाविद्यालयीन मुलीला घरी आणल्याची आणि एक दिवस सांभाळल्याची बातमी कळते. त्याचबरोबर नुंबईकरांनी दाखवलेल्या माणुसकीचे किस्से तो मला सांगतो.

सगळ्याच पक्षांचे नेते फक्त निवडणुकीच्या वेळी मते मागण्याची वेळ आली, कीच जनतेकडे ज़ातात. अतिरेकी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र विधानसभेत आरक्षण विधेयक चहापान घेतानाच हास्यविनोद करत (!!) संमत केले ज़ाते. सुरक्षेसाठी सी सी टी व्ही बसवण्यासाठी सरकारकडे पैसा नसल्याची घोषणा होते, पण मंत्रिमंडळासाठी २० होंडा सिविक गाड्या खरेदी केल्या ज़ातात.  वर्तमानपत्रे, महाजाल यावरील बातम्या, छायाचित्रे, ज़ाणकारांची मते, विश्लेषण ज़ोडीला असतेच.

रहावत नाही हो; खरंच राहवत नाही. या न राहवण्याचा परिणाम म्हणजे हे 'मागणे'. श्रेयसबरोबरचे बोलणे हे या कवितेमागचे तात्कालिक कारण म्हणता येईल.

तुम्ही मनोगती आणि मनोगतेतर जनसामान्य ज्यांनी ही कविता वाचली, स्वतःला कवितेतील परिस्थितीशी 'आयडेंटिफ़ाय' करू शकता, हे मी माझ्या अभिव्यक्तीचे यश मानतो. मग तिच्या तांत्रिक हेळसांडीकडेही मी एकवेळ दुर्लक्ष करेन. आणि त्यामुळे कोणाला कविता टुकार वाटली, तर माझा नाईलाज़ आहे.

टगोजींच्या 'भावना' या शीर्षकाखाली दिलेल्या प्रतिसादातील सर्व मुद्द्यांशी मी सहमत आहे. गोळेकाका आणि सातीताईचेही काही मुद्दे निश्चितच पटण्यासारखे आहेत.

शीलाताई, अमित_भावे, सातीताई, संवादिनी, टगोजी, गोळेकाका, चित्तरंजन सर, मिलिंदराव, प्रवासीपंत, जयंतराव, पापळकरशेठ आणि कविता वाचणाऱ्या सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार.

मुंबईतील वातावरण सुधारावे आणि दहशतवादाचा बीमोड व्हावा, या प्रामाणिक इच्छेपोटी ज़े काही करता येईल, ते करायचे ठरवले आहे. त्यानुसार समविचारी मित्रमैत्रिणींच्या मदतीने काही उपक्रम आखले आहेत. त्यासाठी नक्कीच काम करत राहीन. आमची अभिव्यक्ती आणि इच्छाशक्ती यांची ज़ाणीव आणि आकलन सगळ्यांना होवो, आणि परिस्थितीत सुधारणा होवो, हीच एक प्रार्थना आहे.