"चिकून गुण्या'चा "चिकन'शी संबंध नाही

पुणे, ता. १८ - "चिकून गुण्या' या रोगाचा "चिकन'शी (कोंबडीशी) काहीही संबंध नसून, त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन येथील आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे. ......
....... मराठवाड्यात; तसेच सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये सध्या चिकून गुण्याचे रुग्ण आढळत आहेत. या रोगाचा प्रसार होत असल्याने आणि कोंबडीशी नामसाधर्म्य असल्याने लोकांमध्ये घबराट आहे. चिकून गुण्या हा वेगळा रोग असून, त्याचा कोंबडी किंवा "बर्ड फ्लू' यांच्याशी कसलाही संबंध नसल्याचे येथील डॉ. अच्युत जोशी, डॉ. श्रीकांत वाघ आणि डॉ. शिरीष शेपाळ या तज्ज्ञांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.

"एडिस एजिप्टी' नावाचा बाधित डास चावल्याने चिकुन गुण्या होतो. त्याचे पहिले निदान १९५३ मध्ये टांझानिया येथे झाले. ताप येणे; तसेच तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही त्याची लक्षणे आहेत. याशिवाय या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखणे, प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे आदी लक्षणेही आहेत.

या रोगावरील उपचारांबाबत डॉक्‍टरांनी म्हटले आहे, "संबंधित रुग्णांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, भरपूर प्रमाणात पाणी प्यावे आणि पॅरासिटॉमॉल, क्‍लोरोक्वीन फॉस्फेट, नेप्रॉक्‍सिन आदी वेदनाशामक औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. डॉक्‍टर आणि संबंधित आरोग्य संस्थांनी आपत्ती निवारणाच्या भूमिकेतून या रोगाकडे पाहावे.'

आयुर्वेदिक उपचारात त्रिभुवन कीर्ती, संशमनी वटी, आरोग्यवर्धिनी, अश्वगंधारिष्ट आदी औषधांचा वापर करण्यात हरकत नसल्याचे डॉ. शिरीष शेपाळ यांनी सांगितले.

सांडपाणी, ओला कचरा, शिळे अन्न आदी साठून राहणार नाहीत, याची काळजी नागरिकांनी घ्यावी; तसेच घरात आणि परिसरात स्वच्छता ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.