पण आजकाल हे पैलू वेगळ्याच पध्दतीने पडले (पाडले म्हणा हवं तर) जात आहेत. आपल्या मनोगतवर चर्चेचे रूपांतर भांडणात होत आहे. चर्चा करताना विषयाला लक्ष्य करण्यापेक्षा लेखकाला लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत आहे. एखादा विषय कसा कमकूवत आहे हे सांगण्यापेक्षा लेखक किती बावळट आहे / तो किती आढमुठेपणा करतो किंवा प्रतिसाद देणाराच स्वतःला शहाणा समजतो ह्यावरच वाद जास्त होतात. हळूहळू हि गोष्ट वैयक्तिक पातळीवर येते व आरोप प्रत्यारोप सुरू होतात.
आपल्या लेखातील हा महत्त्वाचा परिच्छेद उचलून मी त्या वर प्रतिसाद देते. (इतर गोष्टींशी बहुतांश सहमत)
१.चर्चा म्हंटली की एकाच विषयाच्या अनेक बाजू, मते, समज, गैरसमज पुढे यायचेच. त्यासाठी ही चर्चा कोणात चालली आहे याला महत्त्व येते. उदा. संपूर्ण आस्तिक गटात चालणारी सकस चर्चा एका नास्तिकाच्या येण्याने कोलमडून पडते.
२.जुन्या नव्याचा वाद. हे मनोगतावर कधी कधी दिसून आले आहे. पूर्वी असं होत नव्हतं किंवा नवी मंडळी वाट्टेल ते बोलतात हे वाचनात आले आहे. परंतु गेल्या एका वर्षात मनोगतींची वाढती संख्या त्यांचे परस्परात नसलले संबंध त्यांची जुन्या मनोगतींविषयीची अनभिज्ञता यामुळे या गोष्टी साहजिक आहेत. जुन्या मनोगतींचे परस्पर हितसंबंध, त्यांचे वय, त्यांची जुने साहित्य हे जाणून त्यावर प्रतिसाद देणे प्रत्येकाला शक्य नसते.
३.इथे लेख आणि कलाकृतींसह जोरदार कंपूबाजी चालते हे सत्य आहे. पण मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्याने ही गोष्ट टाळता येणार नाही. त्यामुळे काही वेळेस लेखकाला लक्ष्य केले जाते, आणि चर्चा भरकटत जाते.
४.आपला प्रतिसाद हा सुसंस्कृत आहे का ही जबाबदारी ज्याची त्याची असते. एखाद्याला आपली शब्दसंपदा भावत असली तरीही ती दुसऱ्याला पटणे बरेचदा कठीण असते. या गोष्टी सापेक्ष आहेत. तेव्हा कुठला शब्द कुणाला कसा दुखवून जाईल हे कसे ठरवायचे? तरीही जातीवाचक, व्याधीवाचक आणि स्थळवाचक शब्दांचा वापर मौजमजेत करणे वेगळे आणि गंभीर आरोप प्रत्यारोपात करणे वेगळे असे मला वाटते.
५.मूळ चर्चा सोडून बरेचसे प्रतिसाद हे प्रतिसादाचे उपप्रतिसाद असतात. त्यात बरेचवेळा पूर्वग्रह दूषित, व्यक्तिगत आकसाचे लिखाणही दिसते. त्यावर दुर्लक्ष करायचे कि सडेतोड उत्तर द्यायचे हा ज्या त्या अभिव्यक्तीचा प्रश्न आहे. अर्थात एका चर्चेचे गुऱ्हाळ दुसऱ्या चर्चेत न लावणे, व्यक्तिगत आकस न ठेवणे ही ज्याची त्याची जबाबदारी आहे. अशा असंस्कृतीचा आपण निषेध करू शकतो.
हे माझे व्यक्तिगत निरीक्षण आहे आणि मला सुचलेले अल्प मुद्दे. प्रत्येकाने आपल्याला शिस्त लावून घेतली तर फरक पडणे अशक्य नाही, कठीण मात्र आहे.
चू. भू. दे. घे.
प्रियाली