मोरू भाऊ ,

किती दिवस तुम्ही एकमेकांच्या सहवासात राहता, यावरून एकमेकांचे पटते वा नाही या गोष्टीचे (किंवा प्रापंचिक यशापयशाचे) मोजमाप करता येत असते तर प्राचीन ऋषिमुनींनी "नातिचरामि" सारख्या प्रतिज्ञांचा लग्नविधीत समावेशच केला नसता. वर्षानुवर्षे एकत्र कॉलेज-लाईफ एंजॉय करून नंतर पटत नाही या कारणासाठी विभक्त होणारी विवाहित जोडपी असू शकतात तशीच रीतसर दाखविण्याचा कार्यक्रम करून (अवघ्या काही दिवसांच्या परिचयावर) एकमेकांना पटवून घेणारी जोडपीही दिसतात. तेव्हा या चर्चेचा सूर असा गणिती आकडेमोडीच्या भावनेने संपवू नका. ज्या इतिहासात आपण वाढलो, जी संस्कृती (भले अंधश्रद्धा वाटो,पण)आपल्याला लाभली, तिच्या दृष्टीने विचार करता विवाहपूर्व संबंध हा विषय आपल्याकडे काळाची गरज म्हणून स्वीकारला जाईल, असे मला तरी वाटत नाही. विवाहपूर्व संबंध हा विषय तसा आपल्याला महाभारतापासून ज्ञात आहे. पेशवाईच्या काळातही मस्तानीचा मुलगा पेशवा बनू शकला नाही. या विषयावर चर्चा करताना हे आवर्जून लक्षात घ्यायला हवे की या देशात विवाहपूर्व संबंधांना परवानगी (अशा स्त्रियांचा उल्लेख रखेली,नाटकशाळा,अंगवस्त्र अशा शब्दांत करीत तर त्यांच्या अनौरस संततीचा उल्लेख पेशवाईत लेकावळा असा करीत.) असली तरी अशा नातेसंबंधांना वा त्या संबंधातून निर्माण होणाऱ्या संततीला कधीही प्रतिष्ठा नव्हती. भविष्यातही अशा नातेसंबंधांना प्रतिष्ठा मिळू नये अशाच मताचा मीही आहे. कदाचित माझा हा प्रतिगामीपणाही ठरेल पण मला तेच योग्य वाटते.

अवधूत.