आपण जेव्हा बैठ्या कौलारू घरांमध्ये राहत होतो तेव्हा मनोरे उंच वाटत. आज जेव्हा आपण १२-१५ मजली इमारतींच्या वरच्या मजल्यांवर राहू लागलो आहोत तेव्हा तथाकथित मनोरेही आपल्या घरांमधून खाली वाकून पाहावे लागत आहेत.
त्याचप्रमाणे हल्ली प्रत्येक जणच अतिवैशिष्ट्यपूर्ण काम करीत असतो. त्याच्या त्याच्या कामात तो तो अतिशय अत्युच्च पदावर (उंचीवर) कार्यरत असतो. त्याला सामान्य लोक (जे वैशिष्ट्यपूर्ण कामे करीत नसतात) ते खूप निम्न स्तरात असल्याचे(त्याच्या कार्यक्षेत्रासंदर्भात) जाणवते.
तसेच दंभ असणारे स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यात पाहत असतात. आज आपण सारेच ज्ञानाच्या एकेका संकुचित क्षेत्रात अत्युच्च पदावर प्राप्त झालेलो असतो. आपापल्या क्षेत्रातील एवढ्या उंचीवरून आपल्या कार्यक्षेत्रातील वावराबाबत इतर कसे अनभिज्ञ आहेत यावरून आपण त्यांच्या ज्ञानाची पातळी मापू पाहतो. तेव्हा आपल्या ज्ञानाबाबत आपली वागणूक दांभिक होत जाते. संकुचित क्षेत्रातील आपले ज्ञान आपल्याला सर्वंकष वाटू लागते. दंभाची एवढी उंची आपण गाठतो की सर्वसामान्यतः दांभिक म्हणवल्या जाणाऱ्या लोकांचे हस्तिदंती मनोरे आपल्याला आपल्या दंभपातळीवरून खाली आहेत असे जाणवू लागते.