मतदानाच्या वयात आले तेव्हा महाविद्यालयात होते. (त्यात काय वेगळं, सगळेच असतात!) ज्या आमदाराचं महाविद्यालय होतं त्यांनी त्या ठिकाणच्या लग्न होऊन दुसरीकडे गेलेल्या मुलींच्या नावावर आम्हा मुलींना एका पक्षाला (जो सध्या सत्तेवर आहे) मतदान करायला लावले. (बऱ्याच मुलींनी मतपत्रिका दोन शिक्के मारुन वाया घालवून निषेध केला.)हे आतापर्यंत केलेलं एकमेव मतदान. त्यानंतर खरं मतदान करण्याच्या वेळी रेशनकार्डावर नाव होतं त्या ठिकाणी मीच नव्हते. लग्न झाल्यानंतर मतदारसंघात आमची पूर्ण इमारतच नव्हती. असे करुन आजतागायत मतदान केलेले नाही. करायचे झाल्यास कुटुंबाचे बहुमत पाहून तिथे मत देईन कारण मला राजकारणात 'काही ना काही नेहमी पेपराच्या पहिल्या पानावर येत असतं आणि पार्लमेंटमधली लठ्ठालठ्ठी दूरदर्शनवर बघायला मजा येते' हे सोडून जास्त माहिती नाही. (गोष्ट फारशी अभिमानाने सांगण्यासारखी नाही. बदलण्याची इच्छा आहे. मनोगतावरच्या चर्चा वाचून ज्ञानात बरीच भर पडत असते.)