शुभदा जोशी यांस,
शरीर व मन एकमेकांपासून वेगळे नसतात. त्यामुळे शरीराच्या अवस्थेचा मनावर व मनाच्या अवस्थेचा शरीरावर परिणाम होत असतो. दाढ दुखत असेल तर टी.व्ही.वर कितीही चांगला कार्यक्रम असला किंवा समोर आवडता खाण्याचा पदार्थ असला तर त्याकडे पाहावतही नाही.
शारीरिक दुखण्यासाठी जसे पेन किलर शोधून काढले आहेत तसेच मनस्तापावरही (रामनाजपाशिवाय दुसरे) पेन किलर आहेत. काही म्हणी व वाक्प्रचार पेन किलरचे काम करतात. घरांत फार भांडणे होऊ लागली की "घरोघर मातीच्याच चुली" असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येते. पण त्यामुळे परिस्थिति बदलत नाही.
पेन किलरचा अगदीच उपयोग नाही असे नाही. काही प्रसंगी महत्वाचे कार्य समोर असतांना वेळ नसल्यामुळे लहानसहान मनस्तापांवर पेन किलर घेऊन हातांतले कार्य पुढे चालवावे लागते. पण सतत पेन किलर घेण्याची संवय लागणे वाईट. तापदायक परिस्थिति बदलायची असेल तर केव्हातरी परिस्थितीला सामोरे जाऊन प्रयत्न करावे लागतात. अशा वेळी पेन किलर हा घातक शॉर्टकट ठरतो.
आपल्या मुद्द्यांना थेट उत्तरे मिळाली नाहीत असे आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. पण वरील लिखाणांतून ती आपण शोधून काढू शकाल असे वाटते.