नाव नसले तरी तसेच काहीतरी दिसणारे एक नाव
खरे आहे. यावरून माझा अनुभव आठवला. माझी जेंव्हा मतदार नोंदणी केली तेंव्हाची गोष्ट-
आमच्या मतदार केंद्रातून (महानगरपालीकेची शाळा, क्र. आठवत नाही.) फक्त तीन नवीन मतदार होते. त्यातला मी एक. त्यातला शेवटचा अर्जदार मी होतो. माझे अक्षर सुवाच्य वगैरे आहे असे (खरे की खोटे कोण जाणे) कौतुक करून त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या तीन अर्जांचे, त्यांच्या अखत्यारीतले पुढचे सोपस्कार माझ्याकडून (चकटफु) करून घेतले. त्यातला एक भाग म्हणून त्या केंद्रातल्या नवीन मतदारांची एक हस्तलिखित यादी मी केली. आणि त्या मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे ती यादी, इतर कागदपत्रे आणि आमचे अर्ज 'वर' पाठवले जाणार होते.
यानंतर चार-सहा महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या. रांगेत जाऊन उभा राहिलो. माझे नाव यादीत नव्हतेच. पण नवीन मतदारांची नावे तर तीनच होती. मग पत्त्यावरून शोधले असता सापडले. गंमत अशी की फक्त माझ्या वडिलांचे नाव आणि आमच्या इमारतीचे नाव यावरून ते नाव माझेच आहे हे सांगता येत होते. माझ्या नावाचा आणि आडनावाचा पुरता बट्ट्याबोळ केला होता.