प्रथम एका वेगळ्या दृष्टिकोनातून मराठी माणसाबद्दलचे विचार व्यक्त केल्याबद्दल शिल्पाचे अभिनंदन! माझ्याही अनेक अ-मराठी मित्रंकडून मी असेच काही ऐकले आहे.
माझ्याबद्दल सांगायचं तर मी मूळची पुण्याची. शनिवार पेठेत शिकलेली. माहेरची आपटे. आमच्या गेल्या अनेक पिढ्या पुण्यनगरीतल्या.. अर्थातच हा लेख वाचून काही गोष्टी खटकल्या काही पटल्या..
माझं मत आहे की उत्तर भारतीय आणि मराठी ह्या जात्याच अतिशय वेगळ्या जीवनपद्धती आहेत. असे वाद होणं स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ आत्मपरीक्षण फक्त मराठी माणसांनीच करावं हे योग्य नाही. भिन्न संस्कृती, जीवनपद्धती भारताला संमृद्ध करतात, त्या तश्याच असूदेत. त्यातच मजा आहे. सगळेच मराठी किंवा उत्तर भारतीयांप्रमाणे वागले तर आयुष्य कंटाळवाणं होईल.
याच चालीवर मलाही या अमराठी टिकाकारांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात
तुम्ही म्हणता कि मराठी माणूस बाहेर पडत नाही, त्यामुळे तो कूपमंडूक असतो. शिवाय उत्तर भारतीय माणूस आदरातिथ्य अधिक करतो, जास्त अदबीने वागतो इ. इ. - हीच तुमची अदब नेमकी मराठी माणसाबद्द्ल बोलतानाच का गायब होते??? खुद्द महाराष्ट्रात येऊन आजूबाजूच्या लोकांप्रमाणे रहायला शिकण्याऐवजी तुम्ही त्यांना नावं ठेवण्याचा मार्ग का पत्करता?
- सण समारंभ भपकेबाज झाले तरच ते बरोबर आणि साधा कार्यक्रम चूक
- बायकोला नोकरी करायला लावणार नाही (का करू देणार नाही?) हे शहाणपण
- वडा पाव किंवा मिसळ खाऊन मिळणारा आनंद हा आलू पराठे खाऊन झालेल्या आनंदापेक्षा दुय्यम
हे नियम कोणाचे? आणि ही जर उत्तर भारतीयांची पद्धत असेल तर सर्वांनी तसेच वागवे ही अपेक्षा गैर नव्हे? हे अहंमन्यतेचे लक्षण नव्हे?