इतरसमाजाच्या मानसीक आधाराची गरज हे महाराज/स्वामी भागवत आहेत का?

हा प्रश्न खूप ढोबळ आहे असं मला वाटतं.  म्हणजे असं की याचं अमुकच असं एक साचेबंद उत्तर कसं देता येईल?  एक गोष्ट निर्विवाद आहे की वरती प्रियालीनं म्हटल्याप्रमाणे आज जवळ जवळ जीवनाच्या प्रत्येक भागात स्पर्धा एवढी प्रचंड जीवघेणी झाली आहे, अस्तित्वाची लढाई एवढी तीव्र झाली आहे, चिंतातूरता (anxiety)  अशा भेसूर स्वरूपात माणसाला भेडसावतीये की या साऱ्याचा ताण माणसाच्या सहन करण्याच्या क्षमतेपलिकडे गेला आहे.  आणि यातून सुटका करुन घेण्यासाठी किंवा हे ताण सहन करण्याची ताकत मिळवण्यासाठी सुरू होते मग वेगवेगळे उपाय शोधण्याची धडपड.  ज्योतिष बघण्याची वाढती गरज हीही यातूनच जन्माला आलेली.  एखाद्या बाबाच्या भजनी लागल्यानं आपल्याला मनःशांती मिळेल असा लोकांचा समज / गैरसमज होतो.  कालानुसार हे गैरसमज पण दूर होतात आणि लोक एका बाबाला सोडून दुसऱ्या बाबाच्या मागे लागतात.   बाबा, महाराज, चमत्कारी लोक समाजाच्या नेमक्या याच दुर्बलतेचा स्वतःची तुंबडी भरण्यासाठी उपयोग करून घेतात.    

प्रत्येक महाराजांची / स्वामीची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र तत्व असतात.  समाजातल्या काही घटकांना ती पटतात काहींना नाही. काहींना विशिष्ठ काळात पटतात काहींना इतर काळात तर काहींना कधीच पटत नाहीत. माझ्यासारख्या माणसाला स्वतःला महाराज स्वामी म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकच व्यक्तिबद्दल घृणा वाटते.  पण दुसऱ्या कुणाला हातातून अंगारा काढणाऱ्या किंवा फोटोतून गायब होणाऱ्या व्यक्तित देव सापडतो.  दुसरं असंही आहे की एखाद्याच्या ज्ञानाची जसजशी उत्क्रांती होत जाते तसतशीही त्याची चमत्कारांवरची श्रद्धा कमी होत जाते. 

बुद्धीवादी, तत्ववेत्त्या माणसाला स्वतःला महाराज वगैरे म्हणवून घ्यावं लागत नाही.  त्याच्या बुध्दीमत्तेनं त्यानं स्वतःचं तत्वज्ञान तयार केलेलं असतं आणि हे तत्वज्ञान तो समाजाला, समाजाच्या भल्यासाठी द्यायला तयार असतो.   पण इथेही विशिष्ट समाजाला हे तत्वज्ञान पटतं आणि विशिष्ठ समाजाला हे  फोल वाटतं.  याचं चांगलं उदाहरण म्हणजे जे. कृष्णमूर्ती किंवा ओशो रजनीश. आणखी एक फरक म्हणजे कुणाला ते तत्वज्ञान भावतं आणि कुणाला तो तत्ववेत्ता.  मला सत्यनारायण गोएंकांचा विपश्यना कोर्स म्हणजे भंपकपणा वाटतो पण बुद्ध तत्वज्ञान आणि विपश्यना तंत्र मला भावतं.  पण ही माझी वैयक्तिक मतं आहेत.  इतर लोकांची याबाबतीतली मतं वेगवेगळी असू शकतात.

आणि म्हणूनच मला असं म्हणायचं होतं की तुमच्या प्रश्नाचं अमुकच असं एक उत्तर देता येणार नाही कारण हा प्रश्न फार ढोबळ आहे.